ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलमधील कामगिरीमुळे भारताच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अपेक्षा उंचावल्या आहेत.
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषकातील पदकांचा दुष्काळ संपवणार का, याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, ओडिशाने हॉकीच्या निमित्ताने जागतिक आणि राष्ट्रीय क्रीडा नकाशावर आपले स्थान अधोरेखित केले आहे. येत्या वर्षभरात भारतात एकदिवसीय क्रिकेट प्रकाराची विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्याची लगीनघाई केव्हाच सुरू झाली आहे. परंतु सध्या देशात सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचा कोणताच माहोल दिसत नाही. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे, हे फक्त पुस्तकात, प्रशासकीय परीक्षांमध्ये किंवा २९ जूनला राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजेच ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी आढळतो. अन्यथा, ओडिशा, पंजाब किंवा उत्तरेच्या काही भागांमध्ये हे हॉकीप्रेम दिसून येते. पण बाकी देशभरात ‘क्रिकेटचे डोही क्रिकेट तरंग’ असेच वातावरण आहे.
‘एफआयएच’ विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारतात दुसऱ्यांदा मिळाले आहे, हेही कौतुकास्पद. याआधी
२०१८मध्ये झालेल्या विश्वचषकात भारताने साखळीचा अडथळा ओलांडून बाद फेरीत वाटचाल केली, परंतु उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सने ती रोखली. त्यावेळी बेल्जियमने प्रथमच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. आठ सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी १२ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने ऐंशीच्या दशकात एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके कमावून वर्चस्व निर्माण केले होते. यापैकी १९७१मध्ये कांस्य, १९७३मध्ये रौप्य तर १९७५मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. ते अखेरचे आणि एकमेव विजेतेपद भारताच्या खात्यावर आहे. २०१८च्या विश्वचषकापासून विश्वचषकाच्या स्पर्धा आराखड्यात उपांत्यपूर्व फेरीची भर पडली. त्याआधीपर्यंत प्रत्येक गटांमधील दोन सर्वोत्तम संघ उपांत्य फेरीत पोहाचायचे. त्यामुळे दोन पराभवांनंतर स्पर्धेतील आव्हान टिकणे कठीण जायचे. २०२१मध्ये ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावून ४१ वर्षांनी कात टाकणाऱ्या भारतीय हॉकी संघापुढे विश्वचषकातील पदकांचाही ४८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान समोर उभे ठाकले आहे. ऑलिम्पिकच्या आधी भारतीय संघाचा बाहेरच्या जगापासून संपर्क तुटला होता. बंगळूरुच्या राष्ट्रीय शिबिरात खेळाडू १६ महिने एकत्रित होते. त्यामुळे निर्माण झालेल्या संघएकात्मतेला (टीम बाऊंडिंग) भारताच्या ऑलिम्पिक पदकाचे यश जाते.
ड-गटात इंग्लंडचे कडवे आव्हान जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरील भारताचा समावेश ड-गटात करण्यात आला आहे. या गटात इंग्लंड (पाचवे स्थान), स्पेन (आठवे स्थान) आणि वेल्स (१५वे स्थान) हे अन्य युरोपियन संघ आहेत. एकंदरीत सांघिक बलाबल पाहता भारत आणि इंग्लंड या गटातून बाद फेरी गाठू शकणारे सशक्त दावेदार असतील. परंतु स्पेनच्या संघाने धक्कादायक निकालाची नोंद केल्यास गटाचे चित्र पालटू शकेल. वेल्सचा संघ प्रथमच विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून माफक अपेक्षाच करता येतील. गटसाखळीत भारताला कडवे आव्हान असेल ते इंग्लंडचे.
मागील सलग तीन विश्वचषक हॉकी स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या इंग्लंडला अद्याप एकदाही
विजेतेपदावर नाव कोरता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. १९८६मध्ये त्यांना अंतिम फेरीत जेतेपदाने हुलकावणी
दिली. ती स्पर्धा इंग्लंडमध्येच झाली होती. ग्रॅहम रिड यांनी प्रशिक्षकपद सांभाळल्यापासून जागतिक हॉकी क्षेत्रात भारतीय हॉकी संघाची दखल घेतली जात आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांतील भारताची कामगिरी ही स्पृहणीय होते आहे. ऑलिम्पिकमधील पदक हा या उंचावणाऱ्या
आलेखाचा महत्त्वाचा टप्पा. त्यानंतर गतवर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक हेसुद्धा महत्त्वाचे. मनदीप सिंग, पीआर श्रीजेश, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास आणि मनप्रीत सिंग यांच्यासारख्या दर्जेदार हॉकीपटूंना भारताला पुन्हा यशोमार्गावर आणण्याचे श्रेय जाते. विश्वचषकाचा भूतकाळ जरी भारतासाठी अनुकूल नसला तरी वर्तमान नक्कीच आशा उंचावतो. घरच्या मैदानावरील वातावरण आणि प्रेक्षक हेसुद्धा भारतासाठी प्रेरणादायी. त्यामुळेच भारताला ही नामी संधी असेल. भारतीय संघ यंदा उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करू शकेल, असा हॉकीमधील जाणकारांचा अंदाज आहे.
टोक्यो ऑलिम्पिकचा नायक २५ वर्षीय सिमरनजीत सिंगला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. गुर्जंत
सिंगसुद्धा सातत्याच्या अभावामुळे या संघात स्थान मिळवू शकला नाही. संभाव्य खेळाडूंची नावे निवडताना बचावपटू वरुण कुमारलाही वगळण्यात आले होते. परंतु अंतिम संघात त्याचा समावेश करण्यात आला. २०२२च्या उत्तरार्धातील सहा महिने प्रभावी नेतृत्व करणारा ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगकडेच भारताच्या आव्हानाची धुरा सोपवण्यात आली आहे. माजी संघनायक मनप्रीत सिंग मध्यरक्षकाची भूमिका बजावेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दुखापतीमुळे प्रो लीग हॉकी आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला आक्रमक ललित उपाध्याय दुखापतीतून सावरत संघात परतला आहे. उपकर्णधार अमित रोहिदास आणि नीलम संजीप सेस यांच्यावर भारताच्या बचावाची भिस्त असेल. परंतु भविष्यातील ड्रॅग-फ्लिकर म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जुगराज सिंगला संघात स्थान मिळवता आलेले नाही. गोलरक्षक पीआर श्रीजेशकारकीर्दीतील चौथी विश्वचषक हॉकी स्पर्धा खेळत आहे. त्याचा अनुभव भारताचे बलस्थान ठरू शकेल.
ओडिशा : देशाची क्रीडा राजधानी
हॉकी हा ओडिशातील सर्वात लोकप्रिय खेळ. अनुपा बार्ला, बिनिता टोप्पो, बिरेंद्र लाक्रा, दिलीप तिर्की, इग्नेस तिर्की, लॅझारूस बार्ला, प्रबोध तिर्की हे भारताचे दर्जेदार हॉकीपटू ओडिशाचेच. परंतु फक्त खेळाडू आणि खेळ यांना आर्थिक पाठबळ न देता ओडिशा सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह ठरले. राष्ट्रीय संघाला पुरस्कृत करणारे ते पहिले राज्य ठरले. २०१८मध्ये ओडिशा सरकारने हॉकी इंडियाशी पाच वर्षांचा करार केला. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाची जर्सी ही ओडिशाची होती. त्याआधी, २०१३मध्ये हॉकी इंडिया लीगमध्ये सहभागी झालेला कलिंगा लान्सर्स हा संघ ओडिशाचाच. येथील ओडिशा औद्योगिक पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि महानडी कोलफिल्ड लिमिटेडच्या मालकीचा. हॉकीतील ही गुंतवणूक एवढ्यावरच मर्यादित राहिली नाही. ‘एफआयएच’ जागतिक हॉकी लीगपाठोपाठ राजधानी भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर २०१८मध्ये विश्वचषक हॉकी स्पर्धासुद्धा यशस्वीपणे पार पडली. २०१९मध्ये ओडिशा सरकार, टाटा स्टील आणि टाटा ट्रस्ट यांच्यातर्फे राज्यात ओडिशा नवल टाटा हॉकी
उच्च कामगिरी केंद्र सुरू झाले. राज्यातील गुणवत्तेची जोपासना करून पुढील पिढीचे हॉकीपटू घडवणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट. यंदाच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदासाठी ओडिशाने अधिक विकसित दावेदारी केली. मागील विश्वचषकात कलिंगा स्टेडियमच फक्त उपलब्ध होते. पण आता रुरकेला येथील २० हजार प्रेक्षकक्षमतेचे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमसुद्धा स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत देशाची क्रीडा राजधानी असे बिरूद ओडिशा राज्य मिरवते आहे. क्रीडा संस्कृती जपण्याचा हाच आदर्श अन्य राज्यांनी घ्यायला हवा.
– प्रशांत केणी (prashantkeni@gmail.com)