फोटो सौजन्य - Social Media
मनीष कुमार हे झारखंडमधील पालकोटचे रहिवासी असून आज ते स्वतःचा डेअरी व्यवसाय आणि दोन लोकप्रिय हॉटेल्स चालवत आहेत. परंतु, त्यांचा हा यशाचा प्रवास अगदी सामान्य सुरुवातीतून झाला आहे. 2003 साली गोस्नर कॉलेज, रांचीमध्ये ते पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होते. याच काळात त्यांच्या मनात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा निर्माण झाली.
त्या काळात पालकोटमध्ये दूध सहज मिळायचं नाही. गावात एखाददुसरा शेतकरीच गाय पाळायचा आणि दूध स्वतःपुरतंच वापरायचा. मनीष कुमार यांच्या घरी एक शेतकरी दूध द्यायला यायचा. एके दिवशी मनीष यांनी त्याच्याकडून विचारले, “मलाही गाय पाळायची आहे.” त्यांनी त्या शेतकऱ्याच्या मदतीने १८ हजार रुपयांना एक चांगल्या जातीची गाय विकत घेतली आणि त्यानंतर शिक्षण सोडून दूध विक्रीला सुरुवात केली.
सुरुवातीला ते पालकोटमध्ये सायकलवर दूध विकत होते. तेव्हा दूधाचा दर फक्त ८ रुपये लिटर होता. नंतर गुमला येथे जास्त मागणी पाहता त्यांनी प्रवासी बसमधून दूध नेणे सुरू केले आणि मोठा बाजार मिळवला. हळूहळू त्यांच्या घरी गाईंची संख्या वाढू लागली आणि दूध उत्पादनही वाढले. दूध विक्रीतून आलेल्या उत्पन्नातून मनीष यांनी ‘हिंदुस्तान डेअरी आणि मिष्ठान’ नावाने एक छोटा हॉटेल सुरू केला. स्वतःच्या गाईंपासून मिळणाऱ्या दुधातून ते विविध मिठाया बनवून विकू लागले. या व्यवसायाने उभारी घेतली आणि त्यांनी गुमलाच्या टॉवर चौकाजवळ २०१२ साली मोठं हॉटेल उघडलं. हळूहळू त्यांच्या मिठायांना आणि दुधाला चांगली मागणी येऊ लागली. त्यानंतर त्यांनी सिमडेगा जिल्ह्यातही दुसरं हॉटेल सुरू केलं.
आज मनीष कुमार यांच्याकडे सुमारे १५० गाई आहेत. त्यांच्या डेअरी व्यवसायात त्यांच्या दोन लहान भावांचाही सहभाग आहे. फक्त कुटुंबापुरतंच नाही तर त्यांनी अनेक स्थानिक बेरोजगार तरुणांना गाय पालन, दूध प्रक्रिया आणि हॉटेलमध्ये नोकरी देऊन रोजगार दिला आहे.