फोटो सौजन्य - Social Media
स्टार्टअपच्या जगात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. समस्येचं योग्य समाधान. दिल्लीतील उद्योजक मोहम्मद सुहैल यांनी अशीच एक गंभीर समस्या ओळखली. प्लास्टिकचा वाढता कचरा, आणि त्यावर उपाय शोधत आपल्या व्यवसायाची पायाभरणी केली. त्यांनी 2020 मध्ये ‘अथर पॅकेजिंग सोल्युशन्स’ या नावाने कंपनी सुरू केली आणि प्लास्टिक कचऱ्याचं रूपांतर कंपोस्टेबल, पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये करण्यास सुरुवात केली.
सुहैल दिल्ली भागात लहानाचे मोठे झाले. त्यांच्या वडिलांनी जुन्या कागद आणि पॉलिस्टरपासून पॅकेजिंग साहित्य बनवण्याचं काम केलं होतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेत सुहैल यांच्या मनात विचार आला ‘वाया गेलेल्या वस्तूंमधून उपयुक्त उत्पादने बनवता येतील का?’ त्यांना औद्योगिक प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम थेट अनुभवायला मिळाले. ते सांगतात, “दिल्लीसारख्या शहरात श्वास घेणंही कठीण झालं होतं.
यामुळे मला जाणवलं की केवळ तक्रार न करता, काहीतरी थेट कृती करण्याची गरज आहे.” अथर पॅकेजिंगच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 200 टन प्लास्टिक कचरा लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचवला आणि त्याचे रूपांतर उपयोगी उत्पादनांमध्ये केलं. यामुळे 300 टन CO₂ उत्सर्जनात घट झाली आहे, जे पर्यावरणासाठी एक मोठं योगदान मानलं जातं.
त्यांच्या कंपनीतून LDPE, BOPP आणि LD प्रकारच्या प्लास्टिकचा पुनर्वापर केला जातो. या प्लास्टिकचं रूपांतर हाय-क्वालिटी पॅकेजिंग प्रॉडक्ट्स जसं की स्टँड-अप झिपर पाउच, थ्री-साइड सील पाउच, नालीदार बॉक्स, क्राफ्ट पेपर पॅकेजिंग यामध्ये केलं जातं. हे साहित्य खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे अशा विविध उद्योगांमध्ये वापरले जाते. पहिल्याच वर्षी त्यांनी 40 कंपन्यांना ग्राहक बनवलं. आज त्यांचं ग्राहक जाळं देशभरातील 60 शहरांमध्ये पसरलं असून, 700 पेक्षा अधिक कंपन्या त्यांच्यासोबत काम करतात. दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, जयपूर, लखनऊ, नोएडा यांसारखी शहरे त्यांच्या मुख्य बाजारपेठा आहेत. आज सुहैल यांच्या अथर पॅकेजिंगचा वार्षिक टर्नओव्हर 1.3 कोटी रुपये इतका आहे. त्यांचा प्रवास केवळ उद्योजकतेचं नव्हे, तर पर्यावरणाशी असलेल्या बांधिलकीचंही उदाहरण ठरतो.