फोटो सौजन्य- iStock
बेलराईज इंडस्ट्रीज देशात दुचाकी, तिचाकी, चारचाकी व कृषी यंत्रे आणि अन्य व्यापारी वाहन उद्योगांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या विविध प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था (सेफ्टी क्रिटिकल सिस्टिम्स) तसेच अन्य इंजिनिअरींग सेवासुविधा पुरवणारी देखील एक अग्रणी कंपनी आहे. या कंपनीने आयपीओ माध्यमातून समभाग विक्री करुन तब्बल रु. 2150/- कोटी रुपये भांडवल उभारण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (डीआरएचपी) दस्तावेज दाखल केला आहे.कंपनीच्या आयपीओद्बारे विक्रीस काढण्यात येणाऱ्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू रु. 5/- ठेवण्यात आले आहे. कंपनी या फ्रेश इश्यूच्या माध्यमातून रु. 2150.00 /- कोटी रुपये भांडवल उभारण्यात येणार आहे. या आयपीओ इश्यूमध्ये ऑफर फॉर सेलचा समावेश करण्यात आलेला नाही.
बेलराईज इंडस्ट्रीजचा आयपीओ इश्यू बुक बिल्डिंग प्रक्रियेद्बारा संपन्न केला जाणार असून त्यात क्यूआयबी अर्थात अर्हताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत.
कंपनीने लीड मॅनेजर्सच्या सल्ल्यानुसार ठराविक समभाग प्री-आयपीओ प्लेसमेंटसाठी उपलब्ध केले असून त्यांचे मूल्य सुमारे रु. 430/- कोटी आहे. प्री-आयपीओच्या माध्यमातून उभी राहीलेली रक्कम इश्यूच्या सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठीच्या रकमेतून वजा करण्यात येणार आहे. ही बाब स्विकारार्ह ठरल्यास, बुक रनिंग लीड मॅनेजर सोबत सल्लामसलत करुनच प्री-आयपीओ रक्कम ठरवण्यात येणार आहे. मात्र प्री-आयपीओ रक्कम आयपीओ इश्यूमधून उभ्या होणाऱ्या एकूण रकमेच्या 20 टक्क्यांपेक्षा अधिक होउ दिली जाणार नाही.
बेलराईज इंडस्ट्रीज कंपनी आयपीओद्बारा उभ्याहोणाऱ्या भांडवलपैकी रु. 1618.08 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. काही कर्जाची पूर्णत: तर काही अंशत: परतफेड अथवा पूर्वफेड करण्यात येणार आहे.
बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड
बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची स्थापना 1996 साली करण्यात आली होती. तेव्हापासून 30 जून 2024 पर्यंत कंपनीने आपला कस्टमर बेस 27 ओईएम पर्यंत विस्तारला आहे.कंपनीच्या उत्पादन यादीमध्ये मेटल चेसिस सिस्टिम्स, पॉलीमर कॉम्पोनंट्स, सस्पेन्शन सिस्टिम्स, बॉडी -इन-व्हाईट कॉम्पोनंट्स आणि एक्झॉस्ट सिस्टिम्ससह काही अन्य उत्पादनांचा समावेश आहे. बेलराईज इंडस्ट्रीजने अचूक शीट मेटल प्रेसिंग व फॅब्रिकेशन या क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. शीट मेटल प्रेसिंग म्हणजे पोलादी पत्रे जोडून, वाकवून वाहनांची बॉडी तयार करण्याचे काम. या कामात बेलराईज इंडस्ट्रीज देशातील पहिल्या तीन प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. मार्च 31, 2024 च्या आकडेवारीनुसार महसूलाच्या तुलनेत, दुचाकी वाहन मेटल कॉम्पोनंट्स क्षेत्रात बेलराईज इंडस्ट्रीजचा एकूण बाजारपेठेत तब्बल 24 टक्के वाटा असल्याची माहिती क्रिसिल अहवालात देण्यात आली आहे.
कंपनी वाहन उद्योगांसाठी निर्माण करीत असलेल्या उत्पादनांची एकूण संख्या 1000 पेक्षा अधिक असून त्यात चेसिस सिस्टीम्स, एक्झॉस्ट सिस्टिम्स, बॉडी -इन-व्हाईट पार्ट्स, पॉलीमर कॉम्पोनंट्स, बॅटरी कंटेनर्स, सस्पेन्शन, स्टीअरींग कॉलम्स, व अन्य उत्पादनांचा समावेश आहे. 30 जून 2024 पर्यंत कंपनीने आपली उत्पादने देश विदेशाच्या बाजारपेठात पाठवली असून त्यात ऑस्ट्रीया, स्लोव्हाकिया, युनायटेड किंगडम, जपान व थायलँड या सारख्या अत्यंत मोठ्या आणि महत्वाच्या बाजारपेठांचाही समावेश आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये बजाज ऑटो लिमिटेड, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हिरो मोटोकॉर्प लिमिटेड, जॅग्वॉर लँडछ रोव्हर लिमिटेड, रॉयल इनफिल्ड मोटर्स लिमिटेडचा समावेश आहे. आठ राज्यातील नऊ शहरात मिळून कंपनीचे एकूण १५ कारखाने सध्या कार्यरत असल्याची माहिती 30 जून 2024 रोजी उपलब्ध करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या कारखान्यांची क्षमता नव्या उत्पादनांसाठी तसेच मूळ उत्पादनांसाठी देखील केली आहे.
आर्थिक कामगिरी
आर्थिक वर्ष 2023 साली कंपनीचा प्रचालन महसूल रु. 6582.50 कोटी रुपये होता. 2024 आर्थिक वर्षात तो 13.70 % वाढून रु. 7,484.24 कोटींवर पोहोचला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, आणि तामिळनाडु राज्यातील कारखान्यांच्या उत्पादन आणि विक्रीत जोरदार वाढ झाल्यामुळे कंपनीच्या प्रचालन महसूलात ही लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच महसूलात वाढ होण्यामागे कच्च्या माल व पर्यायाने सुट्याभागांचे वाढते दर देखील कारणीभूत ठरले आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 310.88 कोटी रुपये करोत्तर नफा कमावला आहे. साल 2023 मध्ये कंपनीने रु. 313.66 कोटी रुपये नफा कमावला होता. तसेच 30 जून 2024 रोजीच्या माहितीनुसार कंपनीच्या एकूण महसूलापैकी 25 टक्के महसूल आंतरराष्ट्रीय व्यवसायातून आला आहे.तसेच 30 जून 2024 रोजी समाप्त तिमाहीत कंपनीला प्रचालनातून रु. 1780.97 कोटी रुपये प्रचालन महसूल मिळाला असून त्यातून रु. 71.58 कोटी रुपये करोत्तर नफा मिळाला आहे.
ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरीटीज अँड कॅपिटल मार्केटस (इंडिया ) प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केटस लिमिटेड या कंपन्या आयपीओच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत तर लींक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या आयपीओ इश्यूची रजिस्ट्रार कंपनी आहे.