विमान वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमान कंपन्यांचे कॅन्सलेशन-रिशेड्यूलिंग शुल्क माफ (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि इंडिगो यांनी तिकीट रद्द करणे आणि वेळापत्रक बदलण्याचे शुल्क माफ केले आहे.
एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि इंडिगो यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, आम्ही ३० एप्रिल २०२५ पर्यंत श्रीनगरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या आमच्या फ्लाइट्ससाठी बदल आणि रद्द करण्याचे शुल्क माफ करत आहोत.
याशिवाय, एअर इंडिया आणि इंडिगो २३ एप्रिल रोजी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन विशेष उड्डाणे चालवतील. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान सकाळी ११:३० वाजता श्रीनगरहून दिल्लीला रवाना होईल. श्रीनगरहून मुंबईला दुपारी १२:०० वाजता विमान उड्डाण होईल.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (DGCA) विमान कंपन्यांना तिकिटांच्या किमती वाढवण्यास आणि रद्द करण्याचे शुल्क माफ करण्यास सांगितले आहे.
बुधवारी एअर इंडिया आणि इंडिगो श्रीनगरहून राष्ट्रीय राजधानी आणि मुंबईसाठी एकूण चार अतिरिक्त उड्डाणे चालवतील. विमान कंपन्यांनी तिकिटांचे पुनर्निर्धारण आणि रद्दीकरण शुल्क देखील माफ केले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि श्रीनगर मार्गावरील विमान भाडेवाढीविरुद्ध कडक सूचना जारी केल्या.
या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर बोजा पडू नये यासाठी विमान कंपन्यांना नियमित भाडे पातळी राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे बुधवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. नायडू यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
तातडीच्या मदत उपायांचा एक भाग म्हणून, श्रीनगरहून चार विशेष विमाने, दोन दिल्लीला आणि दोन मुंबईला पाठवण्यात आली आहेत. अतिरिक्त विमाने तयार ठेवण्यात आली आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे. नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांना मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी राज्य सरकारे आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी पूर्ण सहकार्य करण्याचे आणि जवळून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. एअर इंडिया श्रीनगर ते दिल्ली सकाळी ११.३० वाजता आणि श्रीनगर ते मुंबई दुपारी १२.०० वाजता विमानसेवा चालवेल. एअर इंडिया दिल्ली आणि मुंबईहून श्रीनगरला दररोज पाच उड्डाणे चालवते. या क्षेत्रांमध्ये ‘पुष्टी केलेले बुकिंग’ असलेल्या प्रवाशांना ३० एप्रिलपर्यंत मोफत रीशेड्युलिंग आणि रद्द केल्यास पूर्ण परतफेड देखील एअरलाइन देत आहे.
इंडिगोने म्हटले आहे की श्रीनगरमधील परिस्थिती लक्षात घेता, त्यांनी प्रवासासाठी रीशेड्युलिंग आणि रद्दीकरण शुल्काची सूट ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे, जी २२ एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी केलेल्या बुकिंगवर लागू होती. “याव्यतिरिक्त, आम्ही आज, २३ एप्रिल रोजी श्रीनगरला आणि श्रीनगरहून दोन उड्डाणे चालवत आहोत, एक दिल्लीहून आणि एक मुंबईहून,” असे एअरलाइनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर म्हटले आहे. इंडिगो श्रीनगरहून दररोज २० उड्डाणे चालवते.