फोटो सौजन्य: Pinterest
देशाचा बजेट सादर होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. बजेट सादर करण्याची तयारी सध्या जोरात चालू असून सामान्य नागरिकांना या बजेटकडून खूप अपेक्षा आहे. तसेच अनेक उद्योजकांची नजर सुद्धा या बजेटकडे आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण २३ जुलैला भारताचा बजेट सादर करणार आहेत.
दरवर्षी केंद्र सरकार लोकसभेत बजेट सादर करीत असतात, परंतु आश्चर्याची बाब ही आहे की भारताच्या संविधानात बजेट या शब्दचा उल्लेख देखील नाही. मग प्रश्न असा निर्माण असा होतो की हा बजेट नावाचा शब्द नेमका आला कुठून? आता काहीजण म्हणतील, अनेक शब्दांसारखा हा शब्द देखील इंग्रजांसोबतच आला असेल, पण हे सत्य नाही. चला जाणूया, बजेट शब्द नेमका आला कुठून आणि त्याचे फ्रांससोबत असणारे कनेक्शन.
बजेट हा आज जरी इंग्रजी शब्द मानला गेला असला तरी त्याची उत्पत्ती Bougette या फ्रेंच शब्दापासून झाली आहे. या फ्रेंच शब्दाचा अर्थ बॅग किंवा पाकीट असा होतो. Bougette हा शब्द देखील Bouge पासून घेतला आहे ज्याचा अर्थ लेदर ब्रीफकेस असा आहे.
भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास खूप जुना आहे. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर ब्रिटीश सरकारने भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून घेतला. यानंतर 1860 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्याच वर्षी ब्रिटनमध्ये चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये बजेट आणण्याची परंपरा सुरू झाली. 1860 मध्ये, ब्रिटनचे चॅन्सेलर ऑफ द एक्स्चेक्वर चीफ विल्यम इवर्ट ग्लॅडस्टन लेदर बॅगमध्ये बजेट पेपर्स सादर करण्यासाठी आले. या बॅगवर ब्रिटीश राणीचा मोनोग्राम देखील होता, ज्याला ग्लॅडस्टन बॉक्स असे नाव देण्यात आले होते. तसेच अर्थसंकल्प सादर करताना ब्रीफकेस आणण्याची परंपरा सुरू झाली.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या पहिल्या बजेटदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या ब्रीफकेस परंपरेला छेद दिला आणि ब्रीफकेसऐवजी लाल कपड्यात गुंडाळलेले बजेट आणण्यास सुरुवात केली. या कृतीवर तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यन यांनी पाश्चिमात्य मानसिकतेच्या गुलामगिरीतून बाहेर येण्याचे प्रतिक असे वर्णन केले होते.