भारतीय शेअर बाजाराशी अमेरिकी निवडणुकीचे काय आहे कनेक्शन; 20 वर्षात प्रथमच बाजारात त्सुनामी!
अमेरिकेच्या निवडणुकीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने 2004 ते 2020 या काळात इतकी विध्वंसक घसरण कधीच पाहिलेली नाही. जी 2024 मध्ये दिसून आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये एक टक्क्याहून अधिक घसरण पाहायला मिळाली आहे.
मागील 20 वर्षांत अमेरिकन निवडणुकीच्या काळात भारतीय शेअर बाजारात अशी अस्थिरता कधीही दिसलेली नाही. 2004 मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश सत्तेवर येणार आहेत. हे सर्वांना माहीत होते. 2008 मध्येही बराक ओबामा यांची लाट आली होती. त्यानंतरही बराक ओबामांबद्दल शंका नव्हती. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमनही अनपेक्षित नव्हते. रिपब्लिकन पक्ष बराच काळ सत्तेबाहेर होते.
(फोटो सौजन्य – iStock)
2020 मध्ये अमेरिकी निवडणुकीची लढत कठीण असली तरी, जो बिडेन सत्तेवर येतील, अशी सर्वांनाच आशा होती. मात्र, यावेळी कमला हॅरिस आणि ट्रम्प यांच्यात चुरशीची स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. सत्तेत कोण परतणार हेच कळत नाहीये. त्यामुळेच जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्याबाबत संपूर्ण अमेरिका विभागली गेली आहे. ट्रम्प यांचे पूर्वीचे युग सर्वांनी पाहिले आहे. पण यावेळी त्याने क्रिप्टोप्रेमींना आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
हे देखील वाचा – गुंतवणूकदारांची निराशा..! निफ्टी 24 हजारांच्या खाली, सेन्सेक्सची 942 अंकांनी घसरण!
मस्क यांचा ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा
दुसरीकडे, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांचा ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा आहे. कमला हॅरिस निवडणुकीच्या शर्यतीत थोड्या उशिरा आल्या, पण त्यांच्या प्रचाराचा वेग वाढवून, त्यांनी सर्वसामान्यांमध्ये त्यांनी लोकप्रियता वाढविली आहे. मात्र आता निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारावर काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 2004 पासून आतापर्यंत अमेरिकन निवडणुकीच्या दिवशी भारतीय शेअर बाजार कसा राहिला आहे. हे जाणून घेणार आहोत…
4 नोव्हेंबर 2024 ला मोठी घसरण
4 नोव्हेंबर 2024: भारतीय गुंतवणूकदार आजचा कोसळलेल्या शेअर बाजाराचा दिवस कधीच विसरू शकणार नाही. अमेरिकन निवडणुकांच्या दिवशी शेअर बाजारात एवढी मोठी घसरण कधीच दिसली नव्हती. 2004 ते 2016 पर्यंत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा दिला आहे. सोमवारी सेन्सेक्स 941.88 अंकांच्या घसरणीसह 78,782.24 अंकांवर बंद झाला आहे.
यात ट्रेडिंग सत्रादरम्यान सेन्सेक्स 1500 अंकांनी घसरला आणि 78,232.60 अंकांच्या खालच्या पातळीवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी 309 अंकांनी घसरून 23,995.35 अंकांवर बंद झाला. व्यवहाराच्या सत्रादरम्यान निफ्टीनेही 23,816.15 अंकांसह दिवसाची खालची पातळी गाठली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
2020 मध्ये 1.26 टक्क्यांची वाढ
2020 मधील डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात लढतीतील निवडणुकीत भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ झाली. 3 नोव्हेंबर 2020 रोजी, यूएस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 1.26 टक्क्यांची वाढ झाली आणि सेन्सेक्स वाढीसह 40,261.13 अंकांवर बंद झाला होता. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले. तेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी सेन्सेक्स 0.48 टक्क्यांनी किंचित वाढला आणि सेन्सेक्स वाढीसह 27,591.14 अंकांवर बंद झाला होता.
तर 2012 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूकीदरम्यान, 6 नोव्हेंबर 2012 रोजी सेन्सेक्स 0.30 टक्क्यांनी वाढून, 18,817.38 अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे, निफ्टी 0.35 टक्क्यांनी किंचित वाढून, 5,724.40 अंकांवर बंद झाला होता. याशिवाय 2 नोव्हेंबर 2004 रोजी निवडणुका झाल्या, तेव्हा जॉर्ज डब्ल्यू बुश पुन्हा सत्तेत येताच निवडणुक निकालाच्या दिवशी, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये सुमारे एक टक्का वाढ झाली होती. त्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स 0.88 टक्क्यांनी वाढून, 5754.76 अंकांवर बंद झाला होता.