PF वाढण्याची शक्यता (फोटो सौजन्य - iStock)
२०२५ च्या अर्थसंकल्पात सरकारने मध्यमवर्गासाठी अनेक घोषणा आणि आश्वासने दिली आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करणे. आता सरकार लवकरच नोकरदार मध्यमवर्गाला आणखी एक भेट देऊ शकते, जी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वरील व्याजदरात वाढ म्हणून असेल.
PF हा कामगारांच्या हक्काचा पैसा असून मध्यमवर्गीयांसाठी एक आशा असते आणि यावरील व्याज जर वाढणार असेल तर ती नक्कीच एक आनंदाची बाब ठरू शकते. नक्की बैठकीत काय निर्णय होऊ शकतो याबाबत आपण अधिक माहिती घेऊया
ईपीएफओच्या बोर्ड बैठकीत निर्णय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामध्ये २०२४-२५ साठी पीएफवरील व्याजदर वाढवण्याबाबत चर्चा होऊ शकते. ही बैठक केंद्रीय कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये नियोक्ता संघटना आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभागी होतील. तथापि, बैठकीचा अधिकृत अजेंडा अद्याप जाहीर झालेला नाही.
पीएफचा व्याजदर का वाढू शकतो?
सरकारचे संपूर्ण लक्ष सध्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यावर आहे, ज्यासाठी मागणी आणि वापर वाढवणे आवश्यक आहे. यामुळेच सरकार विविध उपाययोजनांच्या माध्यमातून मध्यमवर्गाला दिलासा देत आहे. आयकर सवलत मर्यादा वाढवल्यानंतर, सरकार आता पीएफवरील व्याजदर वाढवण्याचा विचार करू शकते. यामुळे मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ बचतीतून अधिक पैसे कमविण्यास मदत होईल आणि ते त्यांचे इतर खर्च वाढवू शकतील. यामुळे अनेक मध्यमवर्गीयांना फायदा मिळू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुळात पीएफमुळे अनेकदा मध्यमवर्गीयांना फायदा मिळत असतो. पीएफ असल्यामुळे कोणत्याही वेळी त्यांना मदतीचा हात मिळू शकतो आणि याचा व्याजदर वाढल्यास त्याचा अधिक फायदा मिळू शकतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
मोफत रेशन घेणाऱ्यांवर आता Income Tax ची करडी नजर, ‘या’ यादीत नाव असेल तर गहू-तांदळालादेखील मुकणार
आता पीएफवर किती व्याज आहे?
सरकार गेल्या दोन वर्षांपासून सतत व्याजदर वाढवत आहे. अशा परिस्थितीत, पीएफ खातेधारकांना आशा आहे की यावेळीही व्याजदर वाढू शकतात. सरकारने २०२२-२३ मध्ये पीएफचा व्याजदर ८.१५ टक्के केला होता. नंतर २०२३-२४ मध्ये ते ८.२५ टक्के करण्यात आले. तेव्हापासून, पीएफवर हा व्याजदर दिला जात आहे, जो आता सरकार वाढवण्याचा विचार करू शकते.
ईपीएफओ व्याज किती वाढवू शकते?
बँकांच्या सध्याच्या बेस रेटचा विचार करता, पीएफ व्याजदरात वाढ करण्यास फारसा वाव नाही. अशा परिस्थितीत, सरकार गेल्या वेळीप्रमाणे ०.१० टक्के वाढवू शकते. देशात ७ कोटींहून अधिक लोकांचे ईपीएफओ खाते आहे. नवीन सदस्य त्यात सतत सामील होत आहेत. ईपीएफओच्या पेन्शन फंडात पैसे जमा करणाऱ्यांची संख्याही सतत वाढत आहे.