फोटो सौजन्य - Social Media
हर्ष मारीवाला, मारिकोचे संस्थापक, हे FMCG क्षेत्रातील आघाडीचे उद्योगपती आहेत. सफोला आणि पॅराशूट यांसारखे ब्रँड घराघरात पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. हर्ष मारीवालांचे आजोबा वल्लभदास वसंजी 1862 मध्ये कच्छहून मुंबईत आले. 1948 मध्ये त्यांचे वडील चारनदास यांनी बॉम्बे ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड ची स्थापना केली. हर्ष मारीवालांनी सायडनहॅम कॉलेज मधून शिक्षण घेतल्यानंतर 1971 मध्ये कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला.
1990 मध्ये हर्ष मारीवालांनी मारिको या कंपनीची स्थापना केली, आणि आज हा ब्रँड 25 हून अधिक देशांमध्ये विस्तारला आहे. त्यांनी आपल्या कौशल्य आणि दूरदृष्टीच्या जोरावर मारिकोला एक प्रमुख FMCG कंपनी म्हणून उभे केले. कंपनीच्या सुरुवातीच्या काळात पॅराशूट खोबरेल तेल आणि सफोला रिफाइंड तेल हे उत्पादने लोकप्रिय झाली आणि भारतातील घराघरात पोहोचली. यशस्वी सुरुवात झाल्यानंतर त्यांनी व्यवसायाचा अधिक विस्तार करत केसांची निगा, पुरुष सौंदर्यप्रसाधने, हेल्थ फूड, आणि फॅब्रिक केअर यांसारख्या क्षेत्रांत कंपनीला पुढे नेले. त्यातून लिवॉन, सेट वेट, मेडिकर, निहार आणि सफोला फिटिफाय यांसारखे ब्रँड प्रचंड लोकप्रिय झाले आणि ग्राहकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनले.
व्यवसायातील यशाबरोबरच, हर्ष मारीवालांनी विविध उपक्रम सुरू करत उद्योगजगतातील योगदान अधिक वाढवले. त्यांनी काया लिमिटेड या त्वचा निगा क्लिनिक्सची साखळी उभारली, जी भारत आणि मध्य पूर्वेतील अनेक ठिकाणी कार्यरत आहे. त्याशिवाय, उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांनी असेंट फाउंडेशन, मारिको इनोव्हेशन फाउंडेशन आणि मारीवाला हेल्थ इनिशिएटिव्ह सारखे उपक्रम सुरू केले. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे ते केवळ यशस्वी उद्योजकच नव्हे, तर प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांची पत्नी अर्चना मारीवाला आणि त्यांची मुले रजवी व ऋषभ हेही व्यवसायात सक्रिय असून, त्यांनी कुटुंबीयांसोबत मिळून उद्योगविश्वात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या अथक मेहनतीमुळे आणि दूरदृष्टीमुळे मारिको आज एक ग्लोबल ब्रँड बनला आहे. 2024 मध्ये Forbes नुसार हर्ष मारीवालांची संपत्ती $6.9 अब्ज इतकी असून, त्यांचे नाव भारतातील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींमध्ये घेतले जाते. नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, आधुनिक मार्केट ट्रेंड्सचा अभ्यास आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी मारिको आणि इतर व्यवसायांना मोठ्या उंचीवर नेले आहे.