फोटो सौजन्य - Social Media
जगभरात महागाईचे प्रमाण फार वाढले आहे. फक्त भारतात नव्हे तर इतर देशांमध्येही सारखी परिस्थिती दिसून येत आहे. काही देशांच्या करंसीत डॉलरच्या तुलनेत फार मोठी घसरण दिसून आली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत तसेच रिपोर्ट्स आहेत. जे हे दर्शवतात कि भारतालाही महागाईला सामोरे जावे लागणार आहे. शेअर बाजारात घसरण, करन्सीचे मूल्य कमी होणे, GDP चे घसरते प्रमाण, खाण्या पिण्याच्या वस्तूची वाढती किंमत आणि त्यात बदलते हवामान या सर्व गोष्टी वाढत्या महागाईला कारणीभूत ठरत आहेत. संपूर्ण जागतिक मूल्याला याचा परिणाम सहन करावा लागत आहे.
शेअर बाजारात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स गेल्या ६ महिनांपासून ३ टक्क्यांपासून जास्त घसरला आहे. तसेच एका महिन्यात ४.५०% हून जास्त घसरण यामध्ये पाहण्यात आली आहे. फक्त भारतातच नव्हे तर ही घसरण जागतिक पातळीवर पाहायला मिळत आहे. चीन, युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात ही शेअर बाजारात घसरण पाहिली गेली आहे. जगातील अनेक देशांच्या चलनांची किंमत अमेरिकन डॉलरसोबत तुलना करता खूपच कमी झाली आहे. सध्या भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 85.92 रुपयांवर पोहोचला असून, हा आतापर्यंतचा नीचांक आहे. चीनचं चलन युआनदेखील अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मागील 16 महिन्यांच्या नीचांकावर आहे. अमेरिकन टॅरिफच्या भीतीमुळे युआनची किंमत घसरली आहे. पाऊंडची स्थितीदेखील विशेष चांगली नाही.
भारतासह अनेक देशांची जीडीपीही सध्या कमी झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताची जीडीपी 6.4 टक्के दराने वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी दर आहे. मात्र, अमेरिकेच्या जीडीपीत उंची दिसून येत आहे. अमेरिकेच्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) वार्षिक आधारावर 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची परिस्थिती मात्र बिकट आहे. वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार 2025 मध्ये चीनचा जीडीपी ग्रोथ रेट 4.9 टक्क्यांवरून 4.5 टक्क्यांवर घसरेल. महागाईदरही अनेक देशांत वाढलेली आहे. भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांत खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये या वस्तूंच्या किंमती 2022 च्या तुलनेत सरासरी 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या 20 वर्षांतील वार्षिक सरासरी वाढ फक्त 2.5 टक्के होती.
महागाईच्या तडाख्याला भारतही अपवाद नाही. एचएसबीसी रिसर्चच्या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये भारताची किरकोळ महागाईदर 6.2 टक्के होती, तर नोव्हेंबरमध्येही हा दर उच्च पातळीवर होता. मात्र, आता त्यात घट दिसून येत आहे. महागाई वाढण्यामागे हवामान बदल देखील महत्त्वाचा घटक आहे. जाणकारांच्या मते, अवकाळी पाऊस आणि दुष्काळ याचा थेट फळभाज्यांवर परिणाम होतो. यामुळे अनेकदा पिकं खराब होतात आणि पुरवठा अपुरा होतो. परिणामी, बाजारात वस्तूंच्या किमती वाढतात आणि महागाई वाढते. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी देश एकमेकांना सहकार्य करत असले तरीही, अनेकदा ती मदत पुरेशी ठरत नाही.