देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सोनं (Gold Price Today) 700 रुपयांनी महागलं. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार सोन्याची किंमत 779 रुपयांनी वाढून 58 हजार 689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. याआधी बुधवारी सोन्याचा भाव 57 हजार 910 रुपये होता.
चांदीविषयी सांगायचं (Silver Price Today) तर चांदीची किंमत वाढली आहे. सराफा बाजारात चांदीचा भाव 1,805 रुपयांनी वाढून 71 हजार 250 रुपये प्रति कीलोग्रॅमवर पोहोचला आहे. याआधी 1 फेब्रुवारीला चांदीचा भाव 69 हजार 445 हजार रुपये होता.
भाव का वाढला ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी अर्थसंकल्पामध्ये सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क 20% पासून वाढवून 25%, चांदीवर 7.5% वरून 15% करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारतीय बाजारात सोन्याची किंमत वाढली.
केडिया ग्रुपचे डायरेक्टर अजय केडिया यांच्या मते, केंद्रीय बँकांनी सोने खरेदी वाढवणं हा एक सकारात्मक संकेत आहे. यामुळे सोन्याच्या किमतीला सपोर्ट मिळेल. अजय केडिया यांनी हेदेखील सांगितले की, 2023 मध्ये सोना 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतं.
केंद्रीय बँकांचा 55 वर्षातला सोने खरेदीचा उच्चांक
2022 मध्ये केंद्रीय बँकांची सोने खरेदी दुप्पट झाली. एक वर्षापूर्वी केंद्रीय बँकांनी 450 टन सोनं खरेदी केलं होतं जे 2022 वाढून 1,136 टन झालं. हा 55 वर्षांमधला सोने खरेदीचा उच्चांक आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2022 च्या फक्त चौथ्या तिमाहीत 417 टन सोन्याची खरेदी झाली. तसेच 2022 च्या दुसऱ्या सहामाईत 800 टन खरेदी झाली.
गेल्या एका वर्षात 20 टक्क्यांनी महागले सोने
गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी 2022 ला सोन्याचा भाव 48 हजार 8 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. जो आता 58 हजार 689 रुपये इतका झाला आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात याच्या कीमतीमध्ये 10,681 रुपयांची (20%) वाढ झाली आहे.
गुंतवणुकीची मागणी वाढली
गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये सोन्याची गुंतवणुकीची मागणी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढली.याची दोन कारणं आहेत. पहिलं हे की ईटीएफ आउटफ्लोमध्ये मंदी आणि दुसरे या काळात सोन्याच्या नाण्यांची आणि सोन्याच्या विटांची मागणी जास्त होती. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, जगातील अनेक देशांमध्ये गुंतवणुकदारांमध्ये सोन्याची वीट आणि नाण्यांची मागणी वाढलेली होती. यामुळे चीनच्या बाजारात आलेल्या मंदीला तोंड देणं सोपं झालं. युरोपमध्ये 2022 मध्ये सोन्याच्या विटा आणि नाण्यांची गुंतवणूक 300 टनचा टप्पा पार करुन गेली होती. ज्याचं मुख्य कारण जर्मनीतील वाढती मागणी हे होतं. पश्चिमी आशियातही सोन्याची मागणी वार्षिक सरासरीनुसार 42 टक्क्यांनी वाढली.