IAS तुकाराम मुंढे सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर तुकाराम मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
ऑगस्ट 2026 मधील दिलेल्या आकडेवारीनुसार, तुकाराम मुंढे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे 3.7 मिलियन म्हणजेच 37 लाख फॉलोअर्स असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचा एंगेजमेंट रेट सुमारे 20.35 टक्के असल्याचा दावा आहे.
FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे 2.9 मिलियन फॉलोअर्स आणि 0.50 टक्क्यांच्या आसपास एंगेजमेंट रेट असल्याचे संबंधित आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटवर सुमारे 3 मिलियन फॉलोअर्स असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार फॉलोअर्सच्या बाबतीत मुंढे हे दोन्ही प्रमुख राजकीय नेत्यांपेक्षा पुढे असल्याचा दावा केला जात आहे.
तुकाराम हरिभाऊ मुंढे हे महाराष्ट्र केडरचे 2005 बॅचचे IAS अधिकारी आहेत. नियमांची कठोर अंमलबजावणी, अचानक पाहणी आणि प्रशासकीय शिस्तीसाठी ते ओळखले जातात. मे 2026 पासून महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनात (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित कारवायांवर विशेष भर दिल्याचे सांगण्यात आले आहे.
रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि इतर आस्थापनांमध्ये अचानक तपासणी करत स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, एक्सपायरी डेट आणि अन्नसुरक्षा नियमांची अंमलबजावणी तपासण्याच्या त्यांच्या कारवाया विशेष चर्चेत आल्या आहेत.
मुंढे यांच्या लोकप्रियतेमागे त्यांच्या कारवायांचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओही महत्त्वाचे कारण मानले जात आहे. विविध खाद्य आस्थापनांमध्ये ते स्वतः जाऊन स्वयंपाकघरातील स्वच्छता, खाद्यसामग्रीची गुणवत्ता आणि मुदतबाह्य उत्पादनांची तपासणी करत असल्याचे व्हिडिओंमध्ये दिसते. अस्वच्छता किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देतानाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिले आणि शेअर केले जात आहेत. त्यामुळे एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दैनंदिन कारवाया थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे.
कडक प्रशासकीय भूमिकेमुळे मुंढे यांच्या बदल्याही कायम चर्चेचा विषय ठरल्या आहेत. गेल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांची 25 वेळा बदली झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या संभाव्य बदलीचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेतही चर्चेला आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंढे यांच्या बदलीसाठी कथितरीत्या 250 कोटी रुपये जमा केले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंढे यांची बदली केली जाणार नसल्याचे सभागृहात स्पष्ट केल्याचे वृत्त होते.
दरम्यान, सोशल मीडिया फॉलोअर्स आणि विशेषतः एंगेजमेंट रेट हे सतत बदलणारे आकडे आहेत. त्यामुळे संबंधित आकडेवारी कोणत्या तारखेला आणि कोणत्या विश्लेषण पद्धतीने मोजण्यात आली, यानुसार त्यात फरक पडू शकतो.






