India-US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डीलवरून शेतकऱ्यांचा संताप; अमेरिकन कृषी उत्पादने येणार भारतात? (फोटो-सोशल मीडिया)
India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, जर अमेरिकन कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क शून्यावर आणले तर भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. तसेच, शेतकऱ्यांनी या करारामुळे भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कृषी उत्पादन वाढतील आणि त्याचा थेट परिणाम देशांतर्गत शेतीवर होईल असा दावा केला आहे. तथापि, सरकारचे असे म्हणणे आहे की, या कराराची संपूर्ण माहिती अद्याप उघड झालेली नाही. तसेच, शेती आणि दुग्धव्यवसाय यासारख्या संवेदनशील क्षेत्रांना संरक्षण देण्यात आले आहे.
संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी केले असून त्यात हा करार शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचे विधान केले आहे. तसेच, अमेरिका त्यांच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते, ज्यामुळे त्यांची उत्पादने स्वस्त होतात. जर अशी उत्पादने भारतात आली तर मध्यमवर्गीय शेतकरी जगू शकणार नाहीत. किसान मोर्चाने आरोप केला आहे की सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली हे पाऊल उचलले आहे. तर, दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांची भीती निराधार असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताने त्यांच्या कृषी आणि दुग्ध क्षेत्रांचे पूर्णपणे संरक्षण केले आहे. कराराच्या प्रत्येक पैलू लक्षात घेऊन वाटाघाटी केल्या गेल्या आहेत आणि क्षेत्राशी तडजोड केली गेली नाही. भारत आणि अमेरिका लवकरच या कराराचे तपशीलवार संयुक्त निवेदन जारी करतील. गोयल यांच्या मते, या करारामुळे भारतातील कापड, चामडे, रत्ने आणि दागिने, पादत्राणे आणि उत्पादन क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होतील. असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेच्या भारत अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क शून्यावर आणेल आणि अमेरिकेकडून ५०० अब्ज किमतीच्या वस्तू देखील खरेदी करेल या विधानांमुळे वाद आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या कृषी सचिव ब्रुक रोलिन्स यांनी या करारामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि भारत त्यांच्यासाठी एक प्रमुख बाजारपेठ बनेल. असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी भारत अनेक अमेरिकन कृषी आणि औद्योगिक उत्पादनांवरील शुल्क कमी करण्यास तयार आहे, तरी काही प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताचे नियंत्रण राहील. असे त्यांनी सूचक विधान केले.
या दरम्यान संसदेत भारत-अमेरिका व्यापार करारामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली शेतकऱ्यांचे श्रम विकल्याचा आरोप केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना पीयूष गोयल यांनी राहुल गांधींवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.






