फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारतातील दुग्धव्यवसायाने मागील दशकात उत्तम प्रगती केली आहे. प्रगतीचा हा आलेख असा सुरू राहावा यासाठी व्हीए एक्झिबिशन्स आणि इंडिया डेअरी असोसिएशन (पश्चिम झोन) यांच्या सहकार्याने 5 ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे ‘इंटर डेअरी एक्स्पो 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात या क्षेत्रातील संपूर्ण पुरवठा साखळीशी संबंधित घटक पाहता येणार असून दुग्धव्यवसायातील नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संधी जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. टिकाऊ तंत्रज्ञान, आधुनिक पॅकेजिंग, प्रक्रियेतील नवीन उपाय आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळतील. या प्रदर्शनात 120 हून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी होतील.
भारतात 230.58 दशलक्ष मेट्रिक टन इतके विक्रमी दुग्धोत्पादन
सध्या, भारत हा जगातील सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश आहे. जागतिक पातळीवर होणाऱ्या एकूण दूध उत्पादनापैकी 24% दुग्धोत्पादन भारतात होते. 2023-24 या वर्षात भारतात 230.58 दशलक्ष मेट्रिक टन इतके विक्रमी दुग्धोत्पादन झाले. चीनच्या तुलनेने हे तिप्पट आहे. भारतीय दुग्धक्षेत्र बाजारपेठेची उलाढाल सध्या अंदाजे 125 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी असून यात वार्षिक 9% वाढ होऊन 2030 पर्यंत ही बाजारपेठ 230 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुग्धोत्पादनापासून ते दुग्धप्रक्रिया व पॅकेजिंगमध्ये स्वीकारण्यात आलेले तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे भारत सरकारने भारतीय दुग्धव्यवसायाला दिलेले सक्रिय पाठबळ यामुळे हे शक्य झाले आहे.
भारतीय दुग्धोत्पादन क्षेत्राच्या महत्त्वाच्या भूमिकेविषयी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी म्हणाले, “दुग्धोत्पादन क्षेत्राने 80 मिलियन कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. यात प्रामुख्याने भूमिहीन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. दुग्धोत्पादन क्षेत्र हे विशेषतः महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे आणि देशभरातील महिला सबलीकरणामध्ये या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे.
प्रदर्शनातील उत्पादने
या व्यापारी प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये आणि उपाययोजनांमध्ये दूध व दुग्धजन्य उत्पादने, दुग्धोत्पादन व कृषी साहित्य, पशुवैद्यकीय उपाय, प्रक्रिया व पॅकेजिंगची साधने, ऑटोमेशन व डेटा प्रक्रिया, घटक आणि अॅडिटिव्ह्ज, कोल्ड चेन व्यवस्थापन, वितरण व लॉजिस्टिक, आर्थिक सहाय्य संस्थांनी दिलेले पर्याय, हाय-प्रीसिजन लेबलिंग मशीन, डेअरी तपासणी उपकरणे, टिकाऊपणा, कार्यक्षमता व उत्पादनाची आकर्षकता सुनिश्चित करणाऱ्या पॅकेजिंगच्या उपाययोजना, तसेच दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता टिकवण्यासाठी नवकल्पना यांचा समावेश आहे.
चर्चासत्रे आणि पुरस्कार वितरण
बी2बी एक्स्पोसोबतच इंडियन डेअरी असोसिएशनतर्फे (पश्चिम झोन) ‘भारतातील दुग्धोत्पादन क्षेत्रासाठी जागतिक पातळीवर असलेल्या संधी’ या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. भारताने जागतिक दुग्ध बाजारपेठांमध्ये प्रवेश कसा करावा, यासाठी उत्पादन, निर्यात आणि नियामक आवश्यकतांच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले जाईल. उद्योगातील तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि धोरणकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत. 5 डिसेंबर 2024 रोजी ‘इंटर डेअरी अवॉर्ड्स 2024’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल. दुग्धोत्पादन क्षेत्रात नावीन्यता, उत्कृष्टता आणि उद्योजकतेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.