फोटो सौजन्य - Social Media
ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असलेल्या जॅक्सन समूहातील जॅक्सन इंजिनिअर्स लिमिटेडने गुजरात इंडस्ट्रीज पॉवर कंपनी लिमिटेड (GIPCL) ला १०० मेगावॅट क्षमतेच्या सोलर पीव्ही मॉड्यूल्सचे यशस्वीरित्या वितरण केले आहे. हे सौर मॉड्यूल्स गुजरातमधील खावडा येथे उभारण्यात येणाऱ्या २,३७५ मेगावॅट क्षमतेच्या रिन्यूएबल एनर्जी पार्कसाठी वापरण्यात येणार आहेत.
हा प्रकल्प भारताच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांना गती देण्यासह कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जीआयपीसीएलच्या हरित ऊर्जा प्रकल्पाला भक्कम आधार देण्याच्या उद्देशाने जॅक्सन इंजिनिअर्सने हे मॉड्यूल्स वेळेवर वितरित केली आहेत. कंपनी करारातील क्षमता साध्य करणारी पहिली कंपनी ठरली असून, तिने सुमारे १,९०,००० उच्च-कार्यक्षमता बायफेशियल सोलर पॅनेल्सचे उत्पादन आणि वितरण पूर्ण केले आहे.
या यशस्वी प्रकल्पाबद्दल जॅक्सन सोलर मॉड्युल्स अँड सेल्सचे सीईओ अनुराग गर्ग यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, “या ऐतिहासिक प्रकल्पासाठी जीआयपीसीएलसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या टीमने उत्कृष्ट अंमलबजावणी करत कार्यक्षमतेचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. तसेच, उच्च दर्जाची उत्पादने प्रदान करत भारताच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांना पाठिंबा देण्याबरोबरच, सौर ऊर्जा क्षेत्रात योगदान देण्यास आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. हा प्रकल्प देशाच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला गती देणारा ठरेल आणि भविष्यात सौर ऊर्जा तंत्रज्ञानातील नावीन्य आणि गुणवत्तेचा नवा अध्याय लिहील.”
सध्या जॅक्सन इंजिनिअर्स भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. कंपनीने नुकतेच २.५ गिगावॅट क्षमतेच्या सोलर सेल उत्पादन प्रकल्पाच्या उभारणीसाठी २,००० कोटी रुपये (२१५.९ दशलक्ष डॉलर्स) गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. यासोबतच, सोलर मॉड्यूल उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, सध्या १.२ गिगावॅट असलेली उत्पादन क्षमता २ गिगावॅटपर्यंत नेण्याचा मानस आहे. यामुळे देशांतर्गत सौर ऊर्जा उत्पादनाला चालना मिळेल आणि आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांना पूरक ठरेल.
ही महत्त्वाकांक्षी गुंतवणूक भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच देशांतर्गत उत्पादन आणि संशोधनाला नवीन दिशा देईल. परिणामी, भविष्यात भारताचा सौर ऊर्जा क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाचा मार्ग अधिक मजबूत होईल. या यशस्वी प्रकल्पामुळे जॅक्सन इंजिनिअर्सने आपल्या उत्कृष्टतेचा ठसा उमटवला असून, भविष्यात भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.