"टोल वसुलीचा ८,००० कोटींचा नफा, RFID FASTag प्रणालीचा होत आहे परिणाम", नितीन गडकरी यांचा दावा (फोटो सौजन्य-X)
मुंबई : इन्फोटेक सॉफ्टवेअर अँड सिस्टिम्स प्रा. लि. (i-TEK) या भारतातील अग्रगण्य RFID आणि IoT सोल्यूशन्स कंपनीने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पुण्यातील मुख्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमात सांगितले की, RFID (FASTag) प्रणालीमुळे टोल वसुलीत ८,००० कोटींचा नफा झाला आहे. पुण्यातील i-TEK RFID च्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात ते म्हणाले की या तंत्रज्ञानामुळे रोड टॅक्स वसुलीची प्रक्रिया बदलली आहे. पूर्वी टोल प्लाझावर लांब रांगा असायच्या, परंतु आता इलेक्ट्रॉनिक कलेक्शनमुळे वेळ आणि महसूल दोन्ही वाचत आहे. या प्रणालीतून १०,००० कोटी रुपयांचा आणखी नफा अपेक्षित असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी टोल शुल्क कमी करण्यात आले आहे आणि मासिक पास देखील सुरू करण्यात आले आहेत.
गेल्या 25 वर्षांत i-TEK ने पुण्यातील एका छोट्या स्टार्टअपने सुरू केलेला हा प्रवास आज भारतातील RFID सिस्टीम्स आणि सोल्यूशन्समधील सर्वाधिक विश्वासार्ह नावांपैकी एक होण्यापर्यंत पोहोचला आहे. FASTag च्या रोलआउटमध्ये अग्रणी भूमिका बजावताना कंपनीने भारतातील दर दुसऱ्या वाहनासाठी FASTag उपलब्ध करून दिला आहे. तसेच RFID-सक्षम कंटेनर ई-सील्सच्या माध्यमातून 105 बंदरे आणि इनलँड कंटेनर डेपोजवरील निर्यात व्यवहार अधिक सुरक्षित केले आहेत. रिटेल आणि वेअरहाऊसिंग क्षेत्रातसुद्धा कंपनीच्या उपाययोजनांनी क्रांती घडवली असून, इन्व्हेंटरी सायकल्स काही महिन्यांवरून थेट काही दिवसांवर आणल्या आहेत. लॉजिस्टिक्स, ऑइल अँड गॅस, माइनिंग, युटिलिटीज आणि मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या विविध उद्योगांमध्ये दर वर्षी 300 कोटींपेक्षा जास्त वस्तूंचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग करण्याची क्षमता या सोल्यूशन्समुळे उपलब्ध झाली आहे. नावीन्यपूर्णता आणि राष्ट्रनिर्मितीवर सातत्याने लक्ष केंद्रित करून i-TEK ने भारताच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रवासात एक खऱ्या अर्थाने अग्रस्थानी असलेली एतद्देशीय कंपनी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
तसेच नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारताच्या तंत्रज्ञानाधारित परिवर्तनात i-TEK च्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, “RFID आणि FASTag चा अवलंब हा खरोखरच क्रांतिकारक ठरला आहे. पूर्वी टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि कार्यक्षमतेचा अभाव यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असे. आता हे व्यवहार सुरळीत झाले असून, त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होत आहे. तसेच पारदर्शकतेमुळे सरकारी महसूलातही वाढ होत आहे. हे शक्य करण्यामध्ये i-TEK आणि त्याचे संस्थापक अशिम पाटील यांनी अग्रणी भूमिका बजावली आहे. RFID कंटेनर ट्रॅकिंग आणि बनावटविरोधी उपाययोजनांमधील त्यांच्या नवकल्पनांमुळे भारताच्या लॉजिस्टिक्स, निर्यात आणि बाजारपेठा अधिक सक्षम होत आहेत.
अशा प्रकारचे तंत्रज्ञान म्हणजे राष्ट्रनिर्मिती होय. हे तंत्रज्ञान पारदर्शकता, कार्यक्षमता आणि न्याय सुनिश्चित करते, तसेच विलंब आणि महसुलातील नुकसान कमी करते. आज मला ‘पांचजन्य अनुभव केंद्रा’चे उद्घाटन करण्याचा आनंद आहे, जिथे भारतीय अभियंते आणि उद्योजकांनी विकसित केलेली जागतिक दर्जाची सोल्यूशन्स पाहायला मिळतात. अशा नावीन्यपूर्ण आणि प्रतिभेच्या जोरावर भारत केवळ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच नव्हे, तर आगामी काळात जगातील क्रमांक एकचे ऑटोमोबाइल आणि तंत्रज्ञान केंद्र होईल, असा मला विश्वास आहे. i-TEK चे संस्थापक अशिम पाटील, अवंतिका पाटील आणि संपूर्ण i-TEK टीमचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि भारताच्या नवकल्पना जगभर पोहोचविण्यात त्यांना यश मिळावे, अशा शुभेच्छा देतो.”
नुकतेच सुरू करण्यात आलेले ‘पांचजन्य अनुभव केंद्र’ हे i-TEK च्या भविष्यासाठीच्या दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. जगभरातील अशा प्रकारचे हे पहिलेच असे हे केंद्र असून, येथे RFID आणि IoT च्या प्रत्यक्ष उपयोगांचा अनुभव घेता येतो. यात FASTag-सक्षम टोलिंग, रिटेल क्षेत्रातील इन्व्हेंटरी व सप्लाय चेन ट्रेसिबिलिटी, स्मार्ट फिटिंग रूम्स, जलद चेकआउट, ट्रेड लॉजिस्टिक्समधील सुरक्षित कंटेनर हालचाली, तसेच स्मार्ट वेअरहाऊस आणि रिटेल सप्लाय चेनचे AI-सक्षम मॉनिटरिंग अशा सुविधा समाविष्ट आहेत. i-TEK च्या नवकल्पनांच्या माध्यमातून विविध उद्योग क्षेत्रांचा कायापालट कसा होत आहे आणि त्याचबरोबर भारताच्या व्यापक डिजिटल अर्थव्यवस्थेला कसा हातभार लागत आहेत, हे या केंद्राच्या माध्यमातून समजते.