आयटीआर भरण्याआधी 'हे' वाचाच; 'या' 10 उत्पन्नावर नाही भरावा लागत कोणताही कर!
जशीजशी आयकर भरण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख जवळ येत आहे. तसेतसे अनेकांना कर भरणा करण्याबाबत दडपण येत आहे. अनेकांना कोणकोणत्या उत्पन्नावर कर लागू होतो. याबाबत फारशी माहिती नसते. मात्र, आता तुम्हीही आपला आयकर परतावा भरण्याच्या तयारीत असाल. तर नेमका आयकर हा कोणकोणत्या उत्पन्नावर लागू होतो. आणि कोणते उत्पन्न हे आयकरातून सूट असते. याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
१. कृषी उत्पन्न : आपल्या देशामध्ये शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जात नाही. कृषी उत्पन्न हे पूर्णतः टॅक्स फ्री आहे. ही सूट केवळ पिकांच्या विक्रीवरच नाही तर शेतजमीन किंवा इमारतींचे भाडे आणि शेतजमीन खरेदी किंवा विक्रीतून मिळणारा नफा यावर सुद्धा आहे.
२. ग्रॅच्युटी : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर काही रक्कम मिळते. मात्र, ग्रॅच्युटी स्वरूपात मिळालेली 20 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ही टॅक्स फ्री असते. या ग्रॅच्युटीवर कर्मचाऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नाही.
३. पीएफ : भारतात कंपनी अधिनियम, 1956 अंतर्गत नोंदणीकृत कंपन्यांना अनिवार्य बचत योजना, भविष्य निर्वाह निधी वयानुसार वाढते आणि सेवानिवृत्तीपर्यंत ही रक्कम कर मुक्त असते. एखाद्या कर्मचाऱ्याने 5 वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रियपणे कंपनीत योगदान दिले असेल तर त्याला पीएफवर आयकर भरावा लागत नाही.
४. शिष्यवृत्ती : सरकारी आणि खाजगी संस्थांकडून अभ्यासासाठी शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे.
५. पेन्शन : यूएनओ सारख्या काही संस्थांकडील पेन्शन करमुक्त आहेत. कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींना मिळणारे निवृत्ती वेतन हे सुद्धा करमुक्त आहे.
६. स्वेच्छानिवृत्ती : सेवानिवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्तीवर मिळणारी रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे.
७. गिफ्ट किंवा बक्षीस रक्कम : नातेवाईकांकडून लग्न वा इतर कार्यक्रमात प्राप्त भेटवस्तू देखील करमुक्त आहेत.
८. पार्टनरशिप फर्ममधून मिळणारा लाभ : इन्कम टॅक्स कायद्यानुसार, भागीदारी फर्मच्या उत्पन्नावर संस्था स्तरावर कर आकारला जातो. त्यामुळे फर्मसाठी काम करणारे भागीदार आयकराच्या कक्षेत येत नाही. कारण त्यांना कर भरल्यावर नफ्यातील वाटा मिळतो.
९. भत्ते आणि मोबदला : भारतात कोणत्याही व्यक्तीसाठी काही भत्ते करमुक्त आहेत. परदेशात कार्यरत भारतीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते करमुक्त आहेत. सेवानिवृत्तीवर सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांकडून मिळणारा मोबदला पण कर मुक्त आहे.
१०. कॅपिटल गेन : काही भांडवली नफा हे सुद्धा करमुक्त असतात. शहरी शेत जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या मोबदल्यावर इन्कम टॅक्स भरावा लागत नाही.






