एनपीसीआयने (NPCI) प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ट्रान्झॅक्शन व्हॉल्युम म्हणजेच एकूण व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत ‘PhonePe’ हे ॲप भारतीय युपीआय बाजारात सर्वात मोठा खेळाडू म्हणून आघाडीवर आहे. एकूण बाजारपेठेत एकट्या फोनपेचा वाटा तब्बल 46.1 टक्के इतका प्रचंड आहे. याचा अर्थ देशातील जवळपास निम्मे डिजिटल व्यवहार एकट्या फोनपे ॲपवरून केले जात आहेत. या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर ‘Google Pay’ असून, 32.8 टक्के मार्केट शेअरसह ते बाजारात भक्कमपणे पाय रोवून उभे आहे. दुसरीकडे, एकेकाळी भारतात डिजिटल क्रांतीची सुरुवात करणारे आणि क्यूआर (QR) कोड घरोघरी पोहोचवणारे ‘Paytm’ हे ॲप आता मोठ्या घसरणीसह 7.8 टक्क्यांवर आले असून ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहे.
डिजिटल पेमेंट मार्केटमधील या वर्चस्वाच्या लढाईसोबतच दुसरीकडे एक मोठी बातमी समोर येत आहे. देशात युपीआय व्यवहार सुरक्षित, वेगवान आणि विनाशुल्क ठेवण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2020 पासून ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) म्हणजेच व्यवहार शुल्क पूर्णपणे शून्य केले होते. मात्र, आता ऑनलाईन पेमेंट क्षेत्रातील कंपन्या आणि बँकांचे आर्थिक गणित सुधारण्यासाठी एनपीसीआय (NPCI) मोठ्या व्यावसायिकांच्या युपीआय व्यवहारांवर पुन्हा एकदा शुल्क (MDR) लागू करण्याच्या तयारीत आहे.
या नव्या प्रस्तावानुसार, सर्वसामान्य ग्राहकांवर किंवा छोट्या दुकानदारांवर याचा कोणताही बोजा पडणार नाही. हे व्यवहार शुल्क केवळ अशा मोठ्या कंपन्या आणि व्यावसायिक संस्थांवर लागू केले जाईल, ज्यांची वार्षिक उलाढाल (Turnover) 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच, हे शुल्क केवळ 2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवरच आकारले जाण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना वैयक्तिक पैसे पाठवत असाल (P2P), किंवा छोट्या भाजी विक्रेत्यांना व किरकोळ व्यापाऱ्यांना पैसे देत असाल, तर तुम्हाला यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
यूपीआय व्यवहारांवर पुन्हा मर्यादित स्वरूपात शुल्क सुरू झाल्याने ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ (Paytm) आणि ‘मोबिक्विक’ (MobiKwik) यांसारख्या पेमेंट गेटवे पुरवणाऱ्या फिनटेक कंपन्यांसह राष्ट्रीय बँकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. यामुळे येत्या काळात डिजिटल पेमेंट क्षेत्रात नेमके काय बदल होतात, याकडे आता तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.
स्विगी-फिटपासची नवी भागीदारी; ‘ईटराईट स्ट्रीक चॅलेंज’मधून जिंकता येणार फिटपास 360 सबस्क्रिप्शन






