बंगळुरूची आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी अॅथर एनर्जी आपल्या नवीन ‘EL’ प्लॅटफॉर्मवर आधारित पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे २९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘अॅथर कम्युनिटी डे’ दरम्यान जागतिक पातळीवर अनावरण करणार आहे. ही स्कूटर साधारण १ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) आसपास उपलब्ध होण्याची शक्यता असून, ती कंपनीच्या सध्याच्या ‘रिझ्टा’ मॉडेलच्या श्रेणीत सादर केली जाईल.
या नवीन स्कूटरमुळे अॅथरला कमी किमतीच्या आणि अधिक खपाच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात चांगले स्थान मिळवता येईल. येणाऱ्या सणासुदीच्या काळात ही स्कूटर ग्राहकांसाठी शोरूम्समध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. बाजारात तिची थेट स्पर्धा टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक आणि ओला एस१ एक्स यांसारख्या स्कूटर्सशी असेल.
स्कूटरची वैशिष्ट्ये , रचना आणि डिझाइन
कम्युनिटी डे २०२५ मध्ये सादर करण्यात आलेल्या ‘EL01’ संकल्पनेवर ही स्कूटर आधारित असेल. यात रुंद फ्रंट एप्रन, हँडलबारवर बसवलेली आयताकृती एलईडी हेडलाईट, सपाट आणि लांब सिंगल-सीट तसेच मोठी फूटबोर्ड जागा पाहायला मिळेल. सीटखाली दोन हेल्मेट सहज मावतील एवढी मोठी जागा यात मिळण्याची शक्यता आहे.
प्लॅटफॉर्मची लवचिकता
‘EL’ आर्किटेक्चर अत्यंत लवचिक असून यात २ kWh ते ५ kWh क्षमतेच्या बॅटऱ्या आणि १० ते १४ इंचांचे व्हील्स बसवता येऊ शकतात. चाचणी दरम्यान पाहिलेल्या मॉडेलमध्ये पुढे १४-इंचाचे आणि मागे १२-इंचाचे व्हील दिसून आले असून, पुढील बाजूस डिस्क तर मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.
किंमत कमी करण्यासाठी नवीन बदल
निर्मिती खर्च कमी करण्यासाठी अॅथर यामध्ये बेल्ट-ड्राईव्हऐवजी हब-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर वापरू शकते. तसेच, सीटखालीच एक पेटंट एसी-डीसी चार्जिंग मॉड्यूल दिले जाऊ शकते, ज्यामुळे चार्जिंग केबल स्कूटरमध्येच साठवून ठेवणे सोपे होईल.
स्मार्ट फीचर्स काय आहेत?
स्कूटरमध्ये अॅथरस्टॅक सॉफ्टवेअर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि मल्टिपल राइड मोड्स मिळतील. किंमत आटोक्यात ठेवण्यासाठी बेस व्हेरियंटमध्ये साधी स्क्रीन दिली जाऊ शकते.
या नव्या स्कूटरचे उत्पादन अॅथरच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या नवीन कारखान्यात मोठ्या प्रमाणावर केले जाण्याची शक्यता आहे.






