देशातील महागाई लवकरच कमी होणार; ...केंद्र सरकारकडून मोठी माहिती समोर!
देशात सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना डाळी, भाजीपाला यासह अनेक जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे अवघड जात आहे. मात्र, सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात वेळेत पाऊस झाल्याने, देशातील अनेक भागांमध्ये वेळेत पेरण्या आटोपल्या आहेत. ज्यामुळे यंदा खरिप हंगामात विशेषतः डाळींच्या आणि तांदळाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काय सांगते सरकारची आकडेवारी?
केंद्रीय कृषी विभागाच्या माहितीनुसार, देशभरात यंदा 19 जुलै 2024 पर्यंत खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढून 85.79 लाख हेक्टर झाले आहे. जे मागील वर्षीच्या हंगामात 70.14 लाख हेक्टर नोंदवले गेले होते. भरडधान्य पेरणीखालील क्षेत्र कमी अर्थात 123.72 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 134.91 लाख हेक्टर नोंदवले गेले होते. या खरीप पेरणी हंगामात अखाद्य श्रेणीतील तेलबियांचे क्षेत्र आतापर्यंत 163.11 लाख हेक्टर आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 150.91 लाख हेक्टर नोंदवले गेले होते.
भात लागवडीच्या क्षेत्रातही वाढ
यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनचा पाऊस चांगला पडला आहे. परिणामस्वरूप, देशातील धानाच्या लागवडीत देखील 7 टक्के वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 19 जुलै 2024 पर्यंत देशभरात एकूण 166.06 लाख हेक्टर धान लागवड झाली आहे. जी गेल्या वर्षी 19 जुलैपर्यंत 155.65 लाख हेक्टर इतकी नोंदवली गेली होती. त्यामुळे आता देशातील तांदूळ उत्पादनात वाढ होणार असल्याने, महागाईच्या झळा काहीशा कमी होण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा
मागील वर्षी देशातील तांदूळ दरात मोठी वाढ झाली होती. परिणामी, सरकारने जुलै २०२३ पासून देशातून तांदूळ निर्यात करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. अगदी अशीच परिस्थिती देशात डाळींच्या बाबतीतही असूनही, केंद्र सरकारला गेल्या वर्षभर मोठ्या प्रमाणात डाळींची आयात करावी लागली आहे. अशातच यंदा देशातील डाळींच्या उत्पादनात वाढ होणार असल्याने हा मोठा दिलासा मानला जात आहे.