रतन टाटांनी 'या' कंपनीतून कमावला 23 हजार टक्के नफा; आता कमी केली हिस्सेदारी!
टाटा सन्सचे मानद चेअरमन रतन टाटा यांनी ब्रोकरेज प्लॅटफॉर्म अपस्टॉक्समधील 0.06 टक्के हिस्सा 18 कोटी रुपयांमध्ये विकला आहे. कंपनीतील त्यांच्या मूळ गुंतवणुकीवर त्यांना 23 हजार टक्के परतावा मिळाला आहे. कंपनीचे मूल्यांकन 2022 मध्ये 3.5 अब्ज डाॅलर होते. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.
रतन टाटा यांनी आठ वर्षांपूर्वी अपस्टॉक्समध्ये गुंतवणूक केली होती. या शेअर विक्रीनंतर टाटांचा अपस्टॉक्समधील हिस्सा 1.27 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. टाटा सन्स ही देशातील सर्वात मोठी औद्योगिक समूह टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे.
हे देखील वाचा – 32,000 कोटी घेऊन चीनमध्ये पळाले; विदेशी गुंतवणुकदारांचा भारतीय बाजारातून काढता पाय!
नवीन कंपन्यांमधील गुंतवणूकीची विक्री
टाटा समूहाचे अनेक दशके नेतृत्व केल्यानंतर 80 वर्षीय रतन टाटा यांनी शेकडो स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. आता ते नवीन युगातील कंपन्यांमधील आपली गुंतवणूक विकत आहे. कारण त्यांचे मूल्यांकन सुधारले आहे. अपस्टॉक्सपूर्वी रतन टाटा यांनी आयपीओद्वारे बेबी केअर प्लॅटफॉर्म फर्स्टक्रायचे काही शेअर्स विकले होते.
अपस्टॉक्समध्ये आणखी 95 टक्के हिस्सा
अपस्टॉक्समधील त्यांच्या शेअर विक्रीबद्दल बोलताना एका सूत्राने सांगितले की, रतन टाटा ब्रोकरेज फर्म अपस्टॉक्समधील आपली सुरुवातीची गुंतवणूक काढून घेऊ इच्छित होते आणि नंतर नफा मिळवू इच्छित होते. अपस्टॉक्समध्ये त्यांच्या एकूण हिस्स्यापैकी अजूनही 95 टक्के हिस्सा आहे. कंपनी भविष्यात सार्वजनिक करण्याची योजना आखत आहे. टाटांनी 2016 मध्ये अपस्टॉक्समध्ये 1.33 टक्के हिस्सा खरेदी केला होता.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)