नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये (Share Market Updates) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजार सुरू होताच पहिल्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) ४४० अंकांनी घसरून ५६७५७ अंकांवर पोहोचला. त्यानंतर लगेचच पाच मिनिटांच्या अंतरानी पुन्हा एकदा सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली, सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी कोसळला. सध्या सेन्सेक्स ५६४६७ अंकांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टीत (Nifty) देखील घसरण झाली असून, निफ्टी २३५ अंकांच्या घसरणीसह १६९३६ अंकांवर पोहोचला आहे.
[read_also content=”सोलापूर ते पुणे, सोलापूर ते विजापूर रस्ता सहा पदरी करणार : नितीन गडकरी https://www.navarashtra.com/maharashtra/union-minister-nitin-gadkari-talked-about-solapur-to-pune-6-layer-road-nrka-272930.html”]
गेल्या आठवड्यातदेखील सेन्सेक्समध्ये ११४१ अंकांची घसरण झाली होती. सेन्सेक्समध्ये तब्बल २ टक्क्यांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर चालू आठवड्यात तरी शेअर बाजारात तेजी दिसून येईल,असा गुंतवणूकदारांचा अंदाज होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आज पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या पडझडीसह बंद झाला होता. मात्र आज ओपन होताच सेन्सेक्समध्ये पुन्हा एकदा घट झाली. आज सेन्सेक्स जवळपास सातशे अंकांनी कोसळला आहे. गेल्या मार्च महिन्यात शेअर बाजाराला सर्वाधिक फटका बसला आहे. शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढत असून, त्यामुळे सेन्सेक्समध्ये घसरण होत आहे. ही घसरण केव्हा थांबणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. अनेक कंपन्याच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.