शेअर बाजारात एचडीएफसी बँकेचा शेअर बनला रॉकेट
बुधवारी (ता.३) देखील शेअर बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाली आहे. मंगळवारी प्रथमच मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 80,000 चा टप्पा ओलांडला. परिणामी, आता बँकिंगच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. आज शेअर बाजार सुरु होताच, देशातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअरने रॉकेटच्या वेगात उसळी घेतली. प्रामुख्याने आज एचडीएफसीचा शेअर 3 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. एचडीएफसी बँकेच्या शेअरच्या उसळीमुळे आज आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर्सला देखील बाजारात चांगली साथ मिळाली आहे.
बँक निफ्टीने ओलांडली विक्रमी पातळी
शेअर बाजारातील तेजीदरम्यान आज मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) दोन्ही निर्देशांक सुरुवाती[पासूनच रॉकेट वेगाने व्यवहार करताना दिसून आले. याशिवाय शेअर बाजाराला पूर्ण साठा देत बँक निफ्टीने देखील 53,000 अंकांची विक्रमी पातळी ओलांडली आहे. आजही मुंबई शेअर सेन्सेक्स 80 हजार अंकांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसून आला. तर निफ्टी देखील आपल्या नवीन सर्वकालीन 24,307.25 अंकांच्या उच्च पातळीला कायम आहे.
(फोटो सौजन्य : istock)
बाजार सुरु होताच HDFC चा शेअर बनला रॉकेट
शेअर बाजार सुरू होताच सकाळी 9.15 वाजता HDFC बँकेचा शेअर 1791 रुपयांवर सुरु झाला. अल्पावधीतच त्याने 1794 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला. अर्थात बँकेचे शेअर्स आज तब्बल 3.40 टक्क्यांची उसळी घेत, 1789.35 रुपयांवर व्यवहार करत होते. शेअर्सच्या या वाढीमुळे बँकेचे मार्केट कॅपही 13.44 लाख कोटी रुपये झाले आहे.
‘या’ बँकांच्या शेअर्समध्येही तेजी
एचडीएफसी बँकेसह, आयसीआयसीआय बँकेचा शेअर सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह 1215.85 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. तर ॲक्सिस बँकेच्या शेअरने देखील 2.21 टक्क्यांची उसळी घेतली आहे. आज ॲक्सिस बँकेचा शेअर 1281 रुपयांवर व्यवहार करत होता. इतर बँकिंग समभागांबद्दल बोलायचे झाले तर, खाजगी क्षेत्रातील कोटक बँक शेअर 1.50 टक्क्यांनी वाढून 1799.90 रुपयांवर आणि देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयचा शेअर जवळपास 1 टक्क्यांनी वाढला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)