शेअर बाजार लवकरच गाठणार 1 लाख अंकांचा जादुई आकडा; जाणकारांनी दिलीये 'ही' महत्त्वाची माहिती!
2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्तम राहिले आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) 30 शेअर्सचा सेन्सेक्स असो किंवा मग राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी असो दोघांनीही वर्षभरात नवीन विक्रम रचले आहेत. सेन्सेक्स हा आतापर्यंत 86000 अंकांवर पोहोचला आहे. अशातच आता आगामी काळात देखील भारतीय शेअर बाजार हा जोरदार कामगिरी करणार असल्याचे संकेत मिळत आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्सचा वेग असाच कायम राहिला तर, तो लवकरच १ लाखाचा टप्पा ओलांडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काय म्हटलंय मार्क मोबियस यांनी?
याबाबत बोलताना जागतिक पातळीवरील दिग्गज गुंतवणूकदार मार्क मोबियस यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, चालू वर्षाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स एक लाख अंकांच्या जादुई आकड्याला स्पर्श करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गुंतवणुकदारांमध्ये नवचैतन्य पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – महिनाभरात पैसे झाले दुप्पट; 6 रुपयांच्या या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल!
दिग्गज गुंतवणूकदार आणि बाजार तज्ज्ञ मार्क मोबियस यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, चिनी शेअर्सच्या सततच्या वाढीमुळे या वर्षाच्या अखेरीस सेन्सेक्स 1,00,000 च्या पातळी गाठू शकतो. याशिवाय बाजार नियामक सेबीने व्युत्पन्न क्रियाकलाप मर्यादित करण्यासाठी कठोर नियम केले तर त्याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. असेही त्यांनी म्हटले आहे.
सेन्सेक्सने यापूर्वीच तोडले रेकॉर्ड
मागील आठवडा शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांसाठी जोरदार कामगिरी करणारा राहिला आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 86000 अंकांवर पोहोचला होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्सची सर्वकालीन उच्च पातळी ८५,९७८.२५ आहे. जी गेल्या आठवड्यातच गाठली गेली होती. दरम्यान मागील आठवड्यात बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 1,027.54 अंकांनी अर्थात 1.21 टक्क्यांनी वाढला होता. ज्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत होते.
आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात खराब झाली. सेन्सेक्स-निफ्टी उघडल्यानंतर काही वेळातच पत्त्यांसारखा कोसळला. चालू आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 1272 अंकांनी किंवा 1.49 टक्क्यांनी घसरला आहे. जो आज बाजार बंद होताना 84,299 च्या पातळीवर बंद झाला आहे. या कालावधीत बीएसई लार्जकॅप कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या 30 पैकी 25 समभाग लाल रंगात बंद झाले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)