अदानी ग्रीन एनर्जीच्या उपकंपनी युनिटने एका नवीन प्रकल्पाला सुरुवात केली आहे. अदानी ग्रीनच्या अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फाइव्ह सी लिमिटेडने गुजरातमधील खावडा येथे 185 मेगावॅटचा पवन उर्जा प्रकल्प सुरु केला आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली की या प्रकल्पाच्या कार्यान्विततेसह, अदानी ग्रीन एनर्जीची एकूर कार्यरत अक्षय उर्जा निर्मीती क्षमता 17472.2 मेगावॅट इतकी झाली आहे. संबंधित मंजुरीच्या आधारे 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुविधा सुरु करण्याचा आणि 1 मार्च 2026 पासून वीज निर्मिती सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, नॉर्वेच्या 1.2 ट्रिलियन डॉलर्सच्या सॉवरेन वेल्थ फंडने कथित आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित जोखीमांचा हवाला देत अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ला त्यांची गुंतवणूक पोर्टफोलिओमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात मोठ्या सॉवरेन वेल्थ फंडाचे व्यवस्थापन करणाऱ्या नॉर्जेस बँक इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटने त्यांच्या वेबसाइटवर पोर्टफोलिओमधून काढून टाकलेल्या कंपन्यांमध्ये अदानी ग्रीन एनर्जीची यादी दिली आहे. फंड मॅनेजरने ‘गंभीर भ्रष्टाचार किंवा इतर गंभीर आर्थिक गुन्हे’ हे निर्णयाचे कारण म्हणून सांगितले परंतु ते स्पष्ट केले नाही. जुलै 2020 मध्ये जेव्हा फंडने अदानी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणूक सुरू केली तेव्हा त्याच्या शेअरची किंमत 341 रुपये होती.
अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरची किंमत सध्या प्रति शेअर 1948.20 आहे. ट्रेडिंग दरम्यान, शेअरने 1969.50 चा उच्चांक गाठला. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 11179.20 आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक ₹758 आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जीचा नफा जवळपास 98.94 टक्क्यांनी घसरून 5 कोटी रुपये झाला. कंपनीच्या नफ्यात घट प्रामुख्याने वाढलेल्या खर्चामुळे झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत (डिसेंबर 2024) कंपनीने 474कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 2961 कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 2329 कोटी रुपयांवर होता. वित्त खर्चही गेल्या वर्षीच्या 1251कोटी रुपयांवरून1698कोटी रुपयांवर पोहोचला. तथापि, या तिमाहीत एकूण उत्पन्न 2837 कोटी रुपयांवर पोहोचले, जे गेल्या वर्षी 2636 कोटी रुपयांवर होते.






