शरद पवार पुन्हा पितामह ! आता ठरवतील राष्ट्रवादीच्या भविष्याचा मार्ग (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई / लतीकेश शर्मा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर शरद पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे भीष्म पितामह बनले आहेत. अजित यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली असली तरी या कठीण काळात कुटुंबातील सर्वांत मोठे म्हणून शरद पवार पक्षाचे भीष्म पितामह बनले आहेत. प्रत्येकाच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुढे काय होईल.
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काकांसोबत युती केली. त्यानंतर, राष्ट्रवादीचे दोन्ही गट विलीन होणार, अशी चर्चा सुरू झाली. अजित यांनी स्वतः एका मुलाखतीत म्हटले होते की, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचीही हीच इच्छा आहे. परंतु, योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल. त्यांच्या अचानक निधनामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार? पण भाजप आता नवी ‘रणनीती’ आखणार
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाची जबाबदारी कोण घेणार?, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अजित गटाचे नेते शरद पवार गटात विलीन होण्यास तयार होतील का?, शरद पवार हे अजित गटाच्या नेत्यांसह भाजपच्या नेतृत्वात महायुतीत सामील होतील का?, असे प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागले आहेत. सध्या अजित पवार गटाचे विधानसभेत ४१ आमदार आहेत. लोकसभेत सुनील तटकरे एकमेव खासदार आहेत. अजित गट केंद्र व राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकारचा भाग आहे.
सुप्रिया सुळेंची भूमिका महत्त्वाची
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणात खासदार सुप्रिया सुळेदेखील महत्त्वाची भूमिका बजावतील. विरोधी पक्षात असताना भाजपविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सुप्रिया महायुतीत सामील होतील का, हा मोठा प्रश्न आहे.
विलीनीकरण झाल्यास जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी
जर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले तर शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असू शकतात. त्यांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा विश्वास जिंकावा लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सुनेत्रा पवार यांची अग्निपरीक्षा
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी सर्वात मोठी अग्निपरीक्षा सुरू होईल. पतीच्या मृत्यूच्या वैयक्तिक वेदनांना तोंड द्यावे लागणार असतानाच पक्षाचा वारसा पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्यावर असेल. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत.
सुनेत्रा उपमुख्यमंत्री होतील का?
अजित पवारांच्या निधनानंतर भाजप सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे अजित पवारांच्या समर्थकांना भावनिक संदेश जाईल आणि महायुती अबाधित राहील. शिवाय, मंत्रिमंडळात महिला मंत्रिपदाचा प्रवेश महत्त्वाचा ठरेल. तथापि यावर निर्णय घेण्यापूर्वी भाजपला शिंदेसेनेशी सल्लामसलत करावा लागेल.
हेदेखील वाचा : सत्तेत आल्यानंतर वाढले होते ‘दादां’चे विदर्भ प्रेम; विधानसभेत मोठे यश, स्थानिक स्वराज्यमध्येही चांगल्या जागा






