अजित पवार यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंनी सांत्वन केले (फोटो - सोशल मीडिया)
Ajit Pawar Funeral : बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे निधन झाले आहे. काल (दि.28) विमान अपघातामध्ये अजित पवारांचे अपघाती निधन झाले. चार सभांसाठी मुंबईहून बारामतील निघालेल्या या विमानात अजित पवारांसह आणखी 4 जणांचा समावेश होता. विमानाचा अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांचे पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आस्कमित निधनामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. पवार कुटुंबासाठी देखील ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे. संपूर्ण पवार कुटुंब, बारामतीकर एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागिरक दादांच्या जाण्यामुळे शोकाकुल झाले. अनेक दिग्गज नेत्यांनी बारामती येथे जाऊन अजित पवारांचे अंत्यदर्शन घेतले. पवार कुटुंबियांची भेट त्यांचे सांत्वन केलं. ठाकरे कुटुंब देखील काटेवाडीमध्ये दाखल झाले आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांवर बारामतीत आज केले जाणार अंत्यसंस्कार
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही काल रात्री बारामतीमध्ये पोहोचले. त्यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. बारामतीमधील निवासस्थानी जाऊन उद्धव यांनी दादांचं अंतिम दर्शन घेतलं. सुनेत्रा पवार व दादांच्या कुटुंबियांची भेट घेऊन उद्धव , रश्मी व आदित्य ठाकरे यांनी त्यांचं सांत्वन केलं. यावेळी वातावरण अगदी सुन्न होतं, पवार कुटुंबियांचे भरलेले डोळे, हुंदके पाहून सर्वच गहिवरले. सुनेत्रा पवारांचं सांत्वन करताना रश्मी ठाकरेही गहिवरल्या आहेत.
हे देखील वाचा : Ajit Pawar Funeral: …तर अपघात टळला असता; धावपट्टीवर अंधार आणि तांत्रिक मर्यादा
संपूर्ण महाराष्ट्र हळहळला…!
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेत राहिलेला चेहरा होते. बारामती ही त्यांची राजकीय कर्मभूमी होती. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ते बारामतीसाठी जगले आणि त्यांचा मृत्यूही बारामतीतच झाला. त्यांना राज्यात ‘दादा’ म्हणून संबोधले जात असे, जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची आणि कर्तृत्वाची ओळख होती. बुधवारीही ते पंचायत निवडणुकीच्या जाहीरसभांना संबोधित करण्यासाठी सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले होते. अजितदादा आपली सर्व कामे उरकून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी, 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाल्याचं दिसून येतं आहे.






