देशात गव्हाचे दर का वाढतायेत? दरातील तेजीमागे नेमकं कारण काय? वाचा... सविस्तर!
गेल्या काही दिवसांपासून देशातील गहू दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा संबंध असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. प्रामुख्याने चीन, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि युक्रेन हे देश जागतिक गहू उत्पादनात आघाडीवरील देश आहेत. मात्र, प्रमुख गहू निर्यातदार देश असलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये यावर्षी गहू उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली आहे. ज्याचा थेट परिणाम जागतिक गहू उत्पादनावर झाला असून, कमी उत्पादनाअभावी दरात तेजी पाहायला मिळत आहे. परिणामस्वरूप, भारतात देखील काही काळापासून गहू दरात तेजी पाहायला मिळत आहे.
गहू बाजारात दोन्ही देशांचा हिस्सा
युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरु आहे. जे अजूनही संपलेले नाही. विशेष म्हणजे युद्धसदृश्य परिस्थितीमुळे यावर्षी या दोन्ही देशांतील गहू उत्पादनात मोठी घट झाली आहे. जागतिक गहू बाजारात दोन्ही देशांचा हिस्सा हा जवळपास 25 टक्के इतका आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांपासून युद्धजन्य परिस्थितीमुळे या दोन्ही देशांमध्ये गहू उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात गहू बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. ज्याचा थेट परिणाम हा भारतीय गहू बाजारावर देखील पाहायला मिळत असून, भारतीय बाजारात गहू दरात तेजी दिसून येत आहे.
(फोटो सौजन्य : istock)
देशांतर्गत उत्पादनातही घट
सध्याच्या घडीला देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये गव्हाला 2500 ते 3500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याउलट केंद्र सरकारने मागील वर्षीच्या रब्बी हंगामात गव्हासाठी 2275 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी भारतात एल-निनोच्या प्रभावामुळे देशातील गहू उत्पादन मोठया प्रमाणात घटले होते. केंद्र सरकारने मागील वर्षीच्या रब्बी हंगामात एकूण 372.9 लाख मेट्रिक टन गहू उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित केले होते. ज्यात सरकारला केवळ 265 लाख टन गहू उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यात यश आले आहे. अर्थात देशांतर्गत गहू उत्पादनात देखील घट नोंदवली गेली. ज्याचा थेट परिणाम हा गहू दरांवर झाला असून, तेजी पाहायला मिळत आहे.
रशिया-युक्रेनचे गहू उत्पादन घटले
अमेरिकी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, रशियामध्ये 2023-24 मध्ये 91.50 दशलक्ष मेट्रिक टन (915 लाख मेट्रिक टन) गहू उत्पादन झाले आहे. जे 2024-25 मध्ये 83.0 दशलक्ष मेट्रिक टन (830 लाख टन) इतके कमी नोंदवले गेले होते. त्याचप्रमाणे, युक्रेनमध्ये 2023-24 मध्ये 230 लाख टन गहू उत्पादन झाले होते. जे 2024-25 मध्ये 195 लाख टन इतके कमी नोदवले गेले आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येत आहे. परिणामी भारतातही गहू दर तेजीत पाहायला मिळत आहे.