अधिवेशनात संसदेत गोंधळ (फोटो- नवराष्ट्र)
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत गदारोळ
राहुल गांधी यांनी उपस्थित केला चीनचा मुद्दा
सत्ताधारी अन् विरोधक संसदेत आक्रमक
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आज 4 था दिवस आहे. दरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. दरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान संसदेत चीनचा आणि डोकलामचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे संसदेत गदारोळ उडाला. याबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
संसदेत बोलत असताना राहुल गांधी यांनी चीन, डोकलामचा मुद्दा उपस्थित केला. याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी ज्या पुस्तकाचा हवाला देत सभागृहात बोलत आहेत, ते पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, “मला वेळ दिल्याबद्दल सभागृहाचे आभार. सत्ताधारी कॉँग्रेस पक्षावर अनेक आरोप करत आहे. मी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील काही भाग वाचून दाखवणार आहे. हे तुम्ही नीट ऐका, यावरून कोण देशभक्त आहे आणि नाही ते लक्षात येईल.” त्यावर संसदेत गदारोळ झाला.
त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावर आणि पुस्तकाच्या संदर्भावर आक्षेप घेतला. राहुल गांधी ज्या पुस्तकाचा संदर्भ देत आहेत, ते पुस्तक अजून प्रकाशित झाले नाही. तर त्याबाबत येथे बोलून काय साध्य करायचे आहे? दरम्यान 4 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिभाषणावर उत्तर देणार आहेत. तसेच 11 तारखेला अर्थमंत्री निर्मला सीतारमण देखील बजेटवर उत्तर देण्याची शक्यता आहे.






