फोटो सौजन्य - Social Media
स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात शनिवारी (दि. २०) ‘बौद्धिक संपदा हक्क’ (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स – IPR) या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा पीएम-उषा योजनेअंतर्गत तसेच महाराष्ट्र राज्य पुणे फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापक, संशोधक आणि अभ्यासकांचा या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेची संकल्पना श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची होती. महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य प्रमोद पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) समन्वयक डॉ. व्ही. यू. पोच्छी तसेच पीएम-उषा समन्वयक व आयोजक सचिव डॉ. एस. आय. जुक्कलकर यांनी समर्थपणे सांभाळली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यांनी बौद्धिक संपदा हक्कांचे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील महत्त्व सविस्तरपणे विशद केले. संशोधनातील नावीन्यपूर्ण कल्पना, नवोपक्रम आणि त्यांचे संरक्षण हे आजच्या स्पर्धात्मक युगात अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयश्री हेमके यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. अविनाश कदम यांनी मानले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ज्ञान फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष, पद्मश्री नामांकन प्राप्त डॉ. अजिंक्य रवींद्र कोट्टावार (नागपूर) यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले. त्यांनी बौद्धिक संपदा हक्कांची संकल्पना, त्याचे महत्त्व तसेच पेटंट, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क यांसारख्या विविध प्रकारांवर सविस्तर माहिती दिली. संशोधनातील नवोपक्रमांचे संरक्षण कसे करावे, संशोधन निष्कर्षांचे व्यावसायिक मूल्य कसे वाढवावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शक उदाहरणांसह माहिती दिली. पेटंटचे विविध प्रकार, कॉपीराइटचे नियम, ट्रेडमार्कची नोंदणी प्रक्रिया तसेच संशोधन आणि उद्योजकतेमध्ये IPR चा कसा उपयोग होऊ शकतो, हे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले. ‘उबुंटू’ शाळा आणि तेथील प्रात्यक्षिक उपक्रमांचे उदाहरण देत त्यांनी प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत तीन सत्रांच्या कालावधीत एकूण ६७ प्राध्यापक व संशोधकांनी सहभाग नोंदविला. सहभागी प्राध्यापकांनी आपल्या शंका व प्रश्न मांडत चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात पद्मश्री नामांकन प्राप्त हर्षल गटकिने (नागपूर) यांनी ऊर्जा, ऊर्जेचे विविध उपयोग, हरित ऊर्जा संकल्पना तसेच भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक विकास, शाश्वत ऊर्जा आणि संशोधनातील नव्या शक्यता यावर त्यांनी भर दिला. एकूणच ही कार्यशाळा संशोधन, नवोपक्रम आणि बौद्धिक संपदा संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरली. सहभागी प्राध्यापक व संशोधकांच्या बौद्धिक समृद्धीसाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.






