फोटो सौजन्य - Social Media
अशोका विद्यापीठ आणि एन्व्हायर्नमेंटल डिफेन्स फंड (ईडीएफ) यांनी मुंबईत आयोजित केलेल्या ‘क्लायमेट वर्कफोर्स समिट’ द्वारे भारताच्या हरित परिवर्तनाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या कार्यक्रमात उद्योग, शिक्षण संस्था आणि शासन क्षेत्रातील 150 हून अधिक तज्ञ सहभागी झाले होते.
या समिटचा उद्देश भारतात हरित कौशल्य असलेले कार्यबल तयार करणे आणि हवामान कृतीला उद्योग क्षेत्रात समाविष्ट करणे हा होता. चर्चांदरम्यान फक्त तांत्रिक क्षेत्रातच नव्हे तर उत्पादन, व्यवस्थापन आणि बँकिंगसारख्या सर्वच क्षेत्रांत शाश्वततेचा समावेश आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. ‘क्लायमेट कॉर्प्स फेलोशिप’च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत भारतात 100 पेक्षा जास्त फेलोजना प्रमुख संस्थांमध्ये नेमण्यात आले आहे. हे फेलो हवामान बदल, ऊर्जा बचत आणि हरित नोकऱ्यांसाठी नवकल्पना विकसित करत आहेत.
ईडीएफचे सल्लागार हिशाम मुंदोल यांनी सांगितले की, “क्लायमेट वर्कफोर्स समिट हे भारतात मोठ्या प्रमाणावर हरित कार्यबल तयार करण्याची गरज आणि संधी दोन्ही दाखवते. कमी कार्बन असलेल्या भविष्याकडे पाहून उद्योग, सरकार आणि शैक्षणिक क्षेत्र एकत्र येऊन कौशल्य आणि प्रतिभेबद्दल विचार करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवत आहेत. गेल्या पाच वर्षांत क्लायमेट कॉर्प्स इंडियाच्या प्रवासात हे सहकार्य केंद्रस्थानी राहिले आहे आणि आजच्या चर्चा या सातत्यपूर्ण प्रयत्नातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहेत.”
बेन कॅपिटल, इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक आणि अशोका विद्यापीठाचे संस्थापक अमित चंद्रा म्हणाले, “भारताची आर्थिक स्पर्धात्मकता आणि हवामान नेतृत्व हे कुशल हरित कार्यबल निर्माण करण्याच्या आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे. हा समिट दाखवतो की एकत्रित कृतीद्वारे भारताच्या हवामान आणि आर्थिक प्राधान्यांसाठी तयार नेते आणि कार्यबल घडवता येऊ शकते. आम्ही या प्रयत्नाचा प्रभाव अधिक वाढवण्यास आणि देशाच्या हवामान तयारीत अर्थपूर्ण योगदान देण्यास वचनबद्ध आहोत.”
या समिटमुळे शिक्षण, उद्योग आणि शासन या तीनही क्षेत्रांत हरित कौशल्यांचा एकात्मिक आराखडा तयार करण्याच्या दिशेने देशाने एक निर्णायक पाऊल टाकले आहे.






