फोटो सौजन्य - Social Media
पहिली नोकरी ही प्रत्येकासाठी खास असते. नव्या वातावरणात काम करण्याचा अनुभव, नवीन लोकांशी ओळख आणि शिकण्याची संधी — हे सगळं करिअरचा मजबूत पाया घालण्यासाठी महत्त्वाचं असतं. पण या टप्प्यात काही लहान चुका भविष्यात मोठा अडथळा ठरू शकतात. म्हणूनच, पहिल्या नोकरीत खालील चुका टाळणं गरजेचं आहे.
प्रश्न न विचारणे:
बर्याचदा नवीन कर्मचारी “मी अज्ञानी दिसेन” या भीतीने प्रश्न विचारत नाहीत. पण खरं म्हणजे, शंका विचारल्यानेच शिकता येतं. चुकीच्या पद्धतीने काम करण्यापेक्षा योग्य मार्ग समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
सगळ्यांना इम्प्रेस करणे:
ऑफिसमधील प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केल्यास स्वतःची ओळख हरवते. आपलं काम आणि प्रामाणिकपणा स्वतः बोलू द्या. प्रत्येकाला आवडणं अशक्य आहे, त्यामुळे अनावश्यक कृती टाळा. प्रत्येकाच्या मनात येण्यासाठी आपण आहोत तसेच स्वतःला दाखवा.
फीडबॅककडे दुर्लक्ष करणे:
वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून मिळालेला फीडबॅक आपल्याला सुधारण्यासाठीच असतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रगती थांबते. फीडबॅकला सकारात्मकतेने घ्या आणि त्यावर कृती करा. एखादा चुका काढतो तेव्हा त्याला उलट बोलण्यापेक्षा त्या चुकांकडे लक्ष द्या.
वेळेचे चुकीचे व्यवस्थापन:
पहिल्या नोकरीत वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. वेळेत काम पूर्ण न केल्यास विश्वास कमी होतो. काम, मीटिंग आणि विश्रांती यांचं योग्य संतुलन राखा.
मीटिंगमध्ये चूप राहणे:
मीटिंगमध्ये सक्रिय सहभाग न घेतल्यास तुमचं मत ऐकले जाण्याची संधी गमावली जाते. आत्मविश्वासाने बोला, पण मुद्देसूद आणि आदराने.
नेटवर्किंगपासून लांब राहणे:
केवळ कामात गुंतून राहिल्यास ओळखी कमी होतात. ऑफिसमधील लोकांशी संवाद साधा, कारण भविष्यात ह्याच संपर्कांचा फायदा होतो.
लक्षात ठेवा, पहिली नोकरी ही फक्त अनुभव घेण्यासाठी नाही, तर स्वतःचा व्यावसायिक पाया मजबूत करण्याची संधी आहे. योग्य दृष्टिकोन आणि संयम ठेवल्यास करिअरची वाट नक्कीच सुकर होते.






