फोटो सौजन्य - Social Media
उत्तर प्रदेश पोलिसांचे चर्चित अधिकारी अनुज चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना लवकरच अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. खेळ कोट्यातून आलेले ते उत्तर प्रदेशातील पहिले अधिकारी ठरणार आहेत, जे या पदापर्यंत पोहोचले आहेत. २ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या विभागीय पदोन्नती समिती (DPC) च्या बैठकीत त्यांच्या नावावर अंतिम मुहर लागली असून, आता त्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बहेड़ी गावचे रहिवासी असलेले अनुज चौधरी यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या अनुज यांनी १९९७ ते २०१४ पर्यंत सलग राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जिंकल्या. त्यांनी २००२ व २०१०च्या नॅशनल गेम्समध्ये रौप्यपदक मिळवले आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदकांची कमाई केली. त्यांच्या या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २००१ मध्ये लक्ष्मण पुरस्कार, तर २००५ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला.
उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या प्रतिभेची दखल घेत ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांची खेळ कोट्यातून डिप्टी एसपी पदावर नियुक्ती केली. २०१४ मध्ये नियुक्तीची अधिकृत खात्री झाली आणि २०१९ मध्ये त्यांना पहिली पदोन्नती मिळाली. आता १२ वर्षांची सेवा पूर्ण करून ते ASP पदासाठी पात्र ठरले आहेत.
अनुज चौधरी केवळ खेळातच नाही, तर पोलीस सेवेतही धाडसी निर्णय आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ओळखले जातात. संभल येथील हिंसाचाराच्या वेळी त्यांच्यावर गोळी झडली आणि ते माध्यमांच्या चर्चेत आले. त्यावेळी त्यांनी म्हटले होते – “होळी वर्षातून एकदाच येते, पण जुम्मा ५२ वेळा येतो.” त्यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण झाला, परंतु मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे समर्थन करत म्हटले, “ते एक पहलवान आहेत, आणि पहलवानासारखंच बोलतात.”
यापूर्वीही आजम खान यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे ते चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी मुरादाबादच्या कमिश्नर कार्यालयात भेटींची मर्यादा निश्चित केली होती. त्यांच्या विरोधात काही चौकशाही झाल्या, पण प्रत्येकवेळी त्यांना क्लीन चिट मिळाली.
अनुज चौधरी यांचा प्रवास हे सिद्ध करतो की प्रामाणिक प्रयत्न, शिस्त आणि धाडस असेल, तर खेळाच्या मैदानातून वर्दीतल्या सेवेपर्यंतचा प्रवासही शक्य आहे. आजच्या तरुणांसाठी त्यांची कहाणी प्रेरणास्त्रोत ठरते.