फोटो सौजन्य - Social Media
देशातील अग्रगण्य वित्तीय संस्था नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये अधिकाऱ्यांच्या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रेड ‘A’ (असिस्टंट मॅनेजर) पदांसाठी थेट भरती प्रक्रिया 2025 साली राबविण्यात येणार आहे. NABARD ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक प्रमुख विकास वित्तीय संस्था असून, पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 8 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू राहील. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.nabard.org वर जाऊन अर्ज सादर करावा.
या भरतीसाठी अधिसूचना 4 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून, 20 डिसेंबर 2025 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गासाठी ₹850, तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ₹150 आहे. शुल्क भरतानाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राहील. एकूण 91 पदांवर भरती होणार असून, त्यात असिस्टंट मॅनेजर (रूरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस) साठी 85 जागा, लीगल सर्व्हिस साठी 2 जागा, आणि प्रोटोकॉल व सिक्युरिटी सर्व्हिस साठी 4 जागा आहेत. उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. लीगल सर्व्हिससाठी एलएलबी पदवी, तर सिक्युरिटी सर्व्हिससाठी संरक्षण किंवा सुरक्षा क्षेत्रातील अनुभवासह पदवी आवश्यक आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी वयातील सूट शासन नियमांनुसार दिली जाईल. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. प्रथम प्रिलिमिनरी परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा, आणि शेवटी मुलाखत (Interview). अंतिम निवड मुख्य परीक्षेतील आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.nabard.org या संकेतस्थळावर जाऊन “Career Notices” या विभागात “Recruitment for Grade ‘A’ Officers – 2025” हा पर्याय निवडावा. अधिसूचना नीट वाचून “Apply Online” लिंकवर क्लिक करून सर्व आवश्यक माहिती भरावी, कागदपत्रे अपलोड करावीत आणि शुल्क भरावे. नंतर अर्ज सबमिट करून त्याची कॉन्फर्मेशन पेज डाउनलोड करून ठेवावी.
ही संधी देशभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते, कारण NABARD मध्ये नोकरी म्हणजे स्थिर करिअर, आकर्षक पगार आणि ग्रामीण विकास क्षेत्रात काम करण्याची प्रतिष्ठा.






