फोटो सौजन्य - Social Media
भारतातील विद्यार्थ्यांसाठी एक ऐतिहासिक बदल घडवण्याच्या दिशेने DGCA (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) मोठं पाऊल उचलत आहे. पायलट ट्रेनिंगसाठी आजवर फक्त विज्ञान शाखेतील म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्स शिकलेल्या विद्यार्थ्यांनाच कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) साठी पात्र मानले जात होते. पण आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. DGCA च्या नवीन प्रस्तावानुसार, आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थीही पायलट ट्रेनिंगसाठी पात्र ठरू शकतील.
1990 च्या दशकात DGCA ने पायलट होण्यासाठी विज्ञान शाखेतील विषयांना बंधनकारक केलं होतं. त्यामुळे इतर शाखेतील विद्यार्थ्यांना ओपन स्कूलिंगद्वारे फिजिक्स आणि मॅथ्सचे पेपर देऊन पात्रता मिळवावी लागत होती. मात्र, सध्या हाच नियम बदलण्यासाठी प्रस्ताव नागरिक उड्डयन मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यास, कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतील.
हा बदल केवळ शैक्षणिक अडथळे दूर करणार नाही, तर महिलांसह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एव्हिएशन करिअरचे दरवाजे खुले करणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील फ्लाइंग स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासाठी DGCA ने सर्व प्रशिक्षण संस्थांना विमानांची संख्या, प्रशिक्षकांची पात्रता, सिम्युलेटरची उपलब्धता, ट्रेनिंग कालावधी यासारखी माहिती त्यांच्या वेबसाइटवर स्पष्टपणे देण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे केवळ टॅलेंट पूल वाढणार नाही, तर इंडस्ट्री अधिक समावेशक होईल. मात्र, पायलट ट्रेनिंग अजूनही अत्यंत तांत्रिक, शिस्तबद्ध आणि जबाबदारीची मागणी करणारी प्रक्रिया असेल. त्यामुळे वैद्यकीय फिटनेस आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. DGCA च्या या पॉलिसी अपडेट्सकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. या पॉलिसीमुळे अनेक इतर क्षेत्रातील विद्यार्थी या करिअर पर्यायाकडे आकर्षित होत आहेत. तसेच या निर्णयाने वाणिज्य आणि कला क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांना एव्हिएशन क्षेत्रात येण्याचे आणि करिअर घडवण्याचे खुले निमंत्रण दिले आहे, तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करत एव्हिएशनमध्ये करिअर घडवतील अशी अपेक्षा DGCA ने वर्तवली आहे.