फोटो सौजन्य - Social Media
यूपीएससी परीक्षा म्हणजे भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नाही, तर जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांची ताकदही लागते. अशा परीक्षा पास करून भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी बनले आहेत अभय डागा एक असा युवक ज्याने अभिनयाच्या दुनियेतून सुरुवात करून अखेर UPSC पास केली.
अभय डागा हे मूळचे महाराष्ट्रातील असून ते प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र आणि डॉ. मीना डागा यांचे पुत्र आहेत. त्यांनी वर्ध्याच्या बीव्हीबी लॉयड्स आणि विद्या निकेतन शाळेत शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षणासाठी हैदराबादला गेले. त्यानंतर अभयने आयआयटी खडगपूरमध्ये प्रवेश घेतला. आयआयटीमध्ये असतानाच त्यांना नाटक आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांनी अनेक थिएटर प्ले केले आणि पुढे ‘सिया के राम’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली.
अभयचा करिअर अभिनयापुरताच सीमित राहिला नाही. 2018 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम सुरू केलं. एकीकडे उत्तम नोकरी, उत्तम पगार, तरीही त्यांच्या मनात देशसेवेचं स्वप्न होतंच. त्यामुळे त्यांनी 2021 मध्ये नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
तयारीच्या काळात अभय डागा यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. UPSC ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते आणि यश मिळवण्यासाठी अफाट मेहनतीची गरज असते. अभयने दररोज 10 ते 12 तास अभ्यास करण्याचा निश्चय केला होता. पहिल्या काही प्रयत्नांमध्ये अपयश आलं, पण त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकत, स्वतःमध्ये सुधारणा करत त्यांनी आपली तयारी सुरूच ठेवली. त्यांच्या जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यामुळे अखेर 2023 मध्ये त्यांनी UPSC सिव्हिल सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक 185 मिळवली.
आज ते भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एकेकाळी टीव्ही मालिकांमध्ये झळकणारा अभिनेता, नंतर मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर, आणि आता देशसेवेत गुंतलेला अधिकारी अभय डागा यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचं जीवन हे आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहे. अभय डागा यांची यशोगाथा हेच सिद्ध करते की स्वप्न कोणतंही असो, ते पूर्ण करण्यासाठी धाडस, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. जर मनात ठाम निर्धार असेल, तर कोणतंही ध्येय गाठता येतं. अभय डागा हे खरंच अशा व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक आहेत, जे आपल्या कार्यातून अनेकांना प्रेरणा देतात.