फोटो सौजन्य - Social Media
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) कडून शास्त्रज्ञ/ अभियंता ‘SC’ पदांसाठी अधिकृत भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांमध्ये करण्यात येणार असून, ही गट ‘अ’ दर्जाची राजपत्रित पदे आहेत. ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत, अवकाश विभागामार्फत केली जाणार आहे. देशाच्या प्रतिष्ठित संशोधन संस्थेमध्ये नोकरीची इच्छा असलेल्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २७ मे २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जून २०२५ आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेनंतर मुलाखतीद्वारे केली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. या पदासाठी पात्रतेच्या अटींनुसार उमेदवारांनी अभियांत्रिकी पदवीमध्ये किमान ६५ टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे किंवा CGPA 6.84/10 असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांचे पदवी प्रमाणपत्र ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत उपलब्ध असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा संदर्भात, सामान्य प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय १६ जून २०२५ रोजी २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गासाठी सवलत दिली जाणार आहे. ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षे, अनुसूचित जाती व जमातींना ५ वर्षे आणि दिव्यांग, माजी सैनिक, तसेच केंद्र शासनाचे कर्मचारी यांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
ISRO शास्त्रज्ञ/ अभियंता भरती प्रक्रियेचा समावेश लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय तपासणीमध्ये आहे. पात्र उमेदवारांनी इस्रोच्या अधिकृत वेबसाईट www.isro.gov.in वर जाऊन करिअर/भरती विभागात ऑनलाईन अर्ज करावा. त्यासाठी वैध ईमेल आयडी व मोबाइल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल. अर्ज भरताना आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करून ‘BharatKosh’ पोर्टलद्वारे शुल्क भरायचे आहे. अंतिमतः अर्ज सबमिट करून नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवावा. ही भरती संधी देशासाठी कार्य करण्याची आणि वैज्ञानिक क्षेत्रात करिअर घडवण्याची एक उत्तम संधी आहे.