फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद (CCRAS) अंतर्गत सुरू झालेल्या 2025 च्या भरती प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पूर्वी 31 ऑगस्ट 2025 होती, मात्र आता ती वाढवून 22 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज सादर केलेला नाही त्यांना अर्ज करण्याची अतिरिक्त संधी मिळाली आहे.
या भरती अंतर्गत एकूण 394 पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये ग्रुप अ, ब आणि क वर्गातील विविध पदांचा समावेश आहे. संशोधन अधिकारी यांसारखी ग्रुप अ पदे तसेच ग्रुप ब आणि क मधील इतर पदांसाठी पात्रता निकषानुसार भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एमडी/एमएस, एम.फार्मा, बीएससी नर्सिंग, डिग्री, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा किंवा किमान 10+2 असे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा पदानुसार बदलते, मात्र ती 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे.
निवड प्रक्रियेतील पद्धत देखील ग्रुपनुसार वेगळी ठेवण्यात आली आहे. ग्रुप अ पदांसाठी उमेदवारांना 70 गुणांची संगणक आधारित परीक्षा आणि 30 गुणांचे मुलाखत अशा दोन टप्प्यांतून जावे लागेल. तर ग्रुप ब आणि क पदांसाठी फक्त 100 गुणांची संगणक आधारित परीक्षा घेण्यात येईल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि उमेदवारांनी ccras.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती योग्यरीत्या भरून, कागदपत्रे अपलोड करून आणि अंतिम तारखेपूर्वी फॉर्म सबमिट करणे बंधनकारक आहे. वेळेत अर्ज पूर्ण न केल्यास तांत्रिक अडचणींमुळे फॉर्म नाकारला जाऊ शकतो.
CCRAS मधील ही भरती उमेदवारांसाठी स्थिर सरकारी नोकरीसह आयुर्वेदिक आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी आहे. या माध्यमातून केवळ रोजगाराची हमी मिळणार नाही तर आयुर्वेद क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला आपला हातभार लावण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारीख चुकवू नये आणि त्वरित अर्ज सादर करून या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा.