फोटो सौजन्य - Social Media
पुणे शहरात १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केला आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ सोमवार, १९ जानेवारी रोजी पुणे शहरात पार पडणार आहे. या रेसदरम्यान सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत शहरातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड (एफ.सी. रोड), गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता (जे.एम. रोड) तसेच या मुख्य मार्गांना जोडणारे सर्व उपरस्ते यांचा समावेश आहे.
रस्ते बंद राहिल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शाळा-महाविद्यालयात ये-जा करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. ही संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या आदेशानुसार, पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबागवाडा-कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, सिंहगड रोड तसेच वारजे-कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच विविध व्यावसायिक शिक्षण संस्था सोमवार, १९ जानेवारी रोजी पूर्णतः बंद राहणार आहेत. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही सुट्टी केवळ सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ या एका दिवसापुरतीच मर्यादित असेल. मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ पासून सर्व शैक्षणिक संस्था नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
दरम्यान, ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या स्पर्धेमुळे पुणे शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळणार असून, देश-विदेशातील नामांकित सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मात्र, या काळात वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होणार असल्याने नागरिकांनी, पालकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व पर्यायी मार्गांचा वापर करून आपले नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






