फोटो सौजन्य - Social Media
शिक्षण क्षेत्रात प्रशासनात्मक जबाबदारी सांभाळत समाजाच्या शैक्षणिक प्रगतीत थेट योगदान देण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी शिक्षण अधिकारी हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. शिक्षण अधिकारी होण्यासाठी सर्वप्रथम योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. साधारणपणे कोणतीही पदवी (B.A./B.Sc./B.Com) आणि त्यासोबत B.Ed. असणे आवश्यक मानले जाते. अनेक वेळा M.A., M.Sc., M.Ed. किंवा शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असल्यास निवडीच्या संधी अधिक वाढतात. काही भरती प्रक्रियेत माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून ठरावीक कालावधीचा अनुभवही अपेक्षित असतो. वयोमर्यादा साधारणपणे १८ ते ३८ वर्षे इतकी असते, मात्र मागास प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार सवलत दिली जाते.
शिक्षण अधिकारी पदासाठी भरती प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा राज्य शिक्षण विभागामार्फत केली जाते. यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत सामान्य ज्ञान, भारतीय राज्यघटना, प्रशासन, शिक्षणशास्त्र, शैक्षणिक धोरणे, महाराष्ट्राचा शैक्षणिक इतिहास तसेच चालू घडामोडी यांचा समावेश असतो.
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. मुलाखतीत उमेदवाराची व्यक्तिमत्त्व, प्रशासकीय क्षमता, शैक्षणिक ज्ञान आणि निर्णयक्षमता तपासली जाते. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते व निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिला जातो. शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्तीनंतर प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील शाळांचे प्रशासन, तपासणी, शिक्षक भरती प्रक्रिया, शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी सांभाळावी लागते.
या पदाला शासनाच्या नियमानुसार आकर्षक वेतनश्रेणी, भत्ते, नोकरीची स्थिरता आणि निवृत्तीवेतन यांसारख्या सुविधा मिळतात. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि संयम ठेवला तर शिक्षण अधिकारी होण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकते आणि या एका निर्णयामुळे आयुष्याला भक्कम दिशा मिळू शकते.






