फोटो सौजन्य - Social Media
सुनील गर्जे: नेवासा तालुक्यातील सौंदाळे या छोट्या गावाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. गावकऱ्यांनी दररोज सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत सर्व मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात ३० ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली असून, मंदिरावरील भोंगा वाजताच गावात मोबाईल बंद केले जातात आणि मुले अभ्यासाला बसतात. या निर्णयाला ग्रामसभेची एकमुखाने मंजुरी मिळाली असून गावातील सर्व नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या उपक्रमामागचा उद्देश मुलांमध्ये वाढलेले मोबाईलचे व्यसन कमी करणे आणि त्यांचे लक्ष पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा आहे. कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे मुले सतत मोबाईलशी जोडली गेली होती, ज्यामुळे पालकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या समस्येवर उपाय म्हणून सरपंच शरदराव आरगडे यांनी “मोबाईलमुक्त दोन तास” हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. आता दररोज ठरलेल्या वेळेत मुले अभ्यास करतात, तर प्रौढ मंडळी आपापसात संवाद साधतात, ज्यामुळे कौटुंबिक नाती अधिक घट्ट होत आहेत.
सौंदाळे ग्रामपंचायत ही यापूर्वीही सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते. गावात विधवा महिलांना सणांमध्ये सहभागी होण्याची परवानगी, पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत, कन्यादान योजना, १ रुपयाला पिठाची गिरणी, ५ रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी, आणि मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायतीकडून अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.
सरपंच आरगडे म्हणाले, “मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद हरवला आहे आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दररोज दोन तास मोबाईल बंद ठेवून कुटुंबातील आपुलकी वाढावी, हा या उपक्रमामागचा हेतू आहे.” या अनोख्या निर्णयामुळे सौंदाळे गाव आता ‘मोबाईलमुक्त ग्राम’ म्हणून राज्यात आदर्श ठरत आहे.सौंदाळे गावात आयोजित करण्यात आल्या अनोख्या उपक्रमामुळे चांगलाच फायदा होणार आहे. मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद हरवला आहे आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.






