फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही भारतीय सैन्यात कमीशन ऑफिसर बनण्याचे स्वप्न पाहत असाल आणि तुम्ही १२वी विज्ञान शाखेतून (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित – PCM) उत्तीर्ण असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय सैन्याने टेक्निकल एन्ट्री स्कीम (TES-54) अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून पात्र उमेदवारांना स्थायी कमीशन ऑफिसर बनण्याची संधी मिळणार आहे. या भरतीची खास बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना सैन्याच्या माध्यमातून स्पॉन्सरशिपवर इंजिनिअरिंग पदवी मिळेल. म्हणजेच, प्रशिक्षण काळातच उमेदवारांना उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण दिले जाईल. ही संधी त्यांना उत्तम सैन्य अधिकारी बनण्यासाठी मदत करेल आणि भविष्यातील करिअरसाठी मजबूत पाया ठरेल.
या भरतीसाठी प्रथम JEE (Main) 2025 च्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना SSB इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल. अंतिम निवडीनंतर NDA प्रमाणे कठोर पण प्रतिष्ठित प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर कमीशन ऑफिसर पदावर नियुक्ती केली जाईल.
उमेदवाराने PCM विषयांसह १२वी उत्तीर्ण केलेली असावी आणि JEE (Main) 2025 मध्ये सहभागी झालेले असावे. वयोमर्यादा १६ वर्षे ६ महिने ते १९ वर्षे ६ महिने दरम्यान आहे. म्हणजेच ज्या उमेदवारांचा जन्म २ जुलै २००६ ते १ जुलै २००९ दरम्यान झाला आहे, ते पात्र आहेत.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १३ मे २०२५ पासून सुरू झाली असून अंतिम तारीख १२ जून २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. नवीन वापरकर्त्यांनी प्रथम नोंदणी (Registration) करावी आणि त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा. अर्ज करताना १२वीची मार्कशीट, पासपोर्ट साइज फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज सबमिट केल्यानंतर कन्फर्मेशन पेजचा प्रिंटआउट जरूर घ्यावा. ही संधी केवळ सैन्यात भरती होण्याचीच नाही, तर उच्च शिक्षण आणि प्रतिष्ठित करिअर घडवण्याची देखील आहे.