फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Indian Students Returning From Abroad: परदेशात शिक्षण घेणे हे बऱ्याच काळापासून भारतीय विद्यार्थ्यांचे एक मोठे स्वप्न राहिले आहे. उत्तम शिक्षण, चांगली नोकरी आणि आंतरराष्ट्रीय अनुभवासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी इतर देशांकडे वळतात. तथापि, आता हा ट्रेंड हळूहळू बदलताना दिसत आहे. अलीकडच्या वर्षांत केवळ परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येतच घट झाली नाही, तर अनेक विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्वीच्या तुलनेत लवकर भारतात परत येत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे कि, वाढता खर्च, स्थलांतराचे नियम, बदलत असलेले जॉब मार्केट आणि भारतात वाढणाऱ्या करिअरच्या संधी यासारख्या अनेक कारणांमुळे हा बदल होत आहे. चला तर मग जाणून घेऊया की परदेशी गेलेले भारतीय विद्यार्थी आता पूर्वीपेक्षा लवकर भारतात का परतत आहेत.
‘एमएसएम युनिफाय’ (MSM Unify) चे संस्थापक आणि संचालक संजय लॉल यांच्या मते, परदेशातील शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा विचार आता पूर्वीसारखा राहिला नाही. पूर्वी आंतरराष्ट्रीय शिक्षणाकडे परदेशात कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा मार्ग म्हणून पाहिले जात होते, परंतु आता विद्यार्थी अधिक व्यावहारिक पद्धतीने निर्णय घेत आहेत. आजचे विद्यार्थी आपले करिअर आणि भविष्य लक्षात घेऊन पावले उचलत आहेत. जर त्यांना भारतात उत्तम संधी दिसत असतील, तर ते लवकर परतण्याचा निर्णय घेत आहेत.
शिक्षण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या आकडेवारीनुसार, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. वर्ष २०२३ मध्ये ९.०८ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात शिकायला गेले होते. ही संख्या २०२४ मध्ये घटून ७.७ लाख झाली. तर २०२५ मध्ये ती आणखी घटून ६.२६ लाखांवर पोहोचली. अवघ्या दोन वर्षांत परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे ३१ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.
संजय लॉल यांच्या मते, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये इमिग्रेशनचे नियम पूर्वीपेक्षा खूप कडक झाले आहेत. व्हिसा मिळण्यास जास्त वेळ लागत आहे आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळण्याची परिस्थितीही पूर्वीसारखी सोपी राहिलेली नाही. विशेषतः एआय (AI) आधारित बदलांमुळे प्राथमिक स्तरावरील नोकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणानंतरच्या करिअरबाबत संभ्रम वाढला आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, परदेशातील शिक्षणाची फी सातत्याने वाढत आहे. यासोबतच राहण्याचा खर्चही पूर्वीपेक्षा जास्त झाला आहे. रुपयाच्या मूल्यात झालेल्या घसरणीमुळे परदेशातील शिक्षण अधिक महाग होत आहे. अनेक देशांमध्ये शिक्षण सुरू करण्यापूर्वी बँक खात्यात फंड दाखवण्याची रक्कमही लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबे आता परदेशातील शिक्षणावर होणारा खर्च आणि त्या बदल्यात मिळणारा फायदा यांचे आधीपेक्षा जास्त काळजीपूर्वक मूल्यांकन करत आहेत.
संजय लॉल यांच्या म्हणण्यानुसार, भारताचे जॉब मार्केटही वेगाने बदलत आहे. देशात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, बहुराष्ट्रीय कंपन्या (MNC), एआय आधारित कंपन्या आणि स्टार्टअप्स झपाट्याने वाढत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांच्या संधी वाढल्या आहेत. याच कारणामुळे अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपले करिअर पुढे नेण्यासाठी लवकर भारतात परतणे पसंत करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा बदल आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे महत्त्व कमी झाल्याचे संकेत देत नाही, तर विद्यार्थ्यांची विचारसरणी बदलत असल्याचे दर्शवतो.






