फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरी हवीय पण परीक्षा, मुलाखती आणि त्यातून येणारा ताण नकोय? तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय डाक विभागात (India Post) आता अशी एक संधी उपलब्ध झाली आहे जिथे कोणतीही परीक्षा नाही, केवळ अर्ज करा आणि सरकारी योजनेअंतर्गत काम मिळवा.
भारतीय डाक सेवा ही भारत सरकारचा एक महत्त्वाचा विभाग आहे, ज्यामार्फत देशभरात पत्र, पार्सल, मनी ऑर्डर, स्पीड पोस्ट यांसारख्या सेवा दिल्या जातात. त्याचबरोबर आर्थिक सेवाही देण्यात येतात, जसे की पोस्ट ऑफिस बँकिंग, बचत योजना, विमा योजना इत्यादी. यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे टपाल जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI).
ग्रामीण भागातील लोकांपर्यंत विमा सेवा पोहोचवण्यासाठी आणि विमाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी डाक विभागाने 1995 पासून RPLI सुरू केली होती. ही योजना खास करून ग्रामीण महिला, कामगार आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तयार करण्यात आली आहे.
आता नागपूर ग्रामीण विभागासाठी या योजनेंतर्गत विमा एजंट्सची भरती थेट पद्धतीने केली जात आहे. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. कोणतीही परीक्षा किंवा अनुभव आवश्यक नाही. केवळ अर्ज करा आणि प्रशिक्षणानंतर तुम्ही अधिकृत विमा एजंट म्हणून काम सुरू करू शकता. ही भरती प्रक्रिया 15 जुलै 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्जाची प्रक्रिया अगदी सोपी असून, यासाठी एक QR कोड संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या कोडद्वारे संपूर्ण माहिती, अर्ज फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रांची यादी मिळू शकते.
जर तुम्हाला इंटरनेटमार्फत अर्ज करता येत नसेल, तर तुम्ही जवळच्या डाकघर कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तेथील कर्मचारी तुम्हाला या योजनेबाबत मार्गदर्शन करतील आणि अर्ज करण्यास मदत करतील. ही नोकरी तुमच्यासाठी केवळ उत्पन्नाचे साधन ठरणार नाही, तर समाजातील गरजूंना विमा कव्हर देऊन तुम्ही एक जबाबदार सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जाल. त्यामुळे आजच निर्णय घ्या. परीक्षा नाही, टेन्शन नाही… फक्त अर्ज करा आणि सरकारी योजनेंतर्गत एक चांगले करिअर सुरू करा!