फोटो सौजन्य - Social Media
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. ने 2025 मध्ये एकूण 1400 पदांसाठी भरती जाहीर केली असून, यात “एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ” आणि “लोडर” या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन igiaviationdelhi.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे.
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. ग्राउंड स्टाफ पदासाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. कोणत्याही बोर्डामधून बारावी उत्तीर्ण असलेले तसेच ITI किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले उमेदवारही पात्र आहेत. लोडर पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, हे पद फक्त पुरुष उमेदवारांसाठी खुलं आहे. खास बाब म्हणजे या भरतीसाठी कोणताही एव्हिएशन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट बंधनकारक नाही, त्यामुळे फ्रेशर्सनाही संधी आहे. उमेदवार दोन्ही पदांसाठी पात्र असल्यास, दोन्ही पदांसाठी वेगवेगळे अर्ज सादर करू शकतात, मात्र त्यासाठी परीक्षा शुल्क स्वतंत्रपणे भरावे लागेल.
वयोमर्यादा बाबतीत, ग्राउंड स्टाफसाठी वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे लागते, तर लोडर पदासाठी ही मर्यादा 20 ते 40 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. निवड प्रक्रियेअंतर्गत प्रथम उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा 90 मिनिटांची असेल आणि यामध्ये सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, गणित, इंग्रजी (लोडरसाठी नाही) आणि विमानतळसंबंधी ज्ञानावर आधारित प्रश्न असतील. लेखी परीक्षेत कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही. ग्राउंड स्टाफ पदासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मात्र लोडर पदासाठी केवळ लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.
पगाराच्या बाबतीत, ग्राउंड स्टाफला दरमहा ₹25,000 ते ₹35,000 तर लोडर पदासाठी ₹15,000 ते ₹25,000 इतका मासिक पगार दिला जाईल. ही भरती केवळ नोकरीची संधी नसून, उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव देणारी ठरेल. त्यामुळे ज्या उमेदवारांना विमानतळावर नोकरी करून स्वतःचं करिअर घडवायचं आहे, त्यांनी ही संधी नक्कीच मिळवावी.