फोटो सौजन्य - Social Media
रसायनीजवळील शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात 6 व 7 मे 2025 रोजी आयोजित महा जॉब फेअर 2025 ला भरघोस प्रतिसाद मिळाला. या रोजगार मेळाव्यात देशातील नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत, हजारो विद्यार्थ्यांना संधी दिली. एकूण 6,723 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 3,533 विद्यार्थ्यांनी थेट मुलाखती दिल्या. त्यातून 217 विद्यार्थ्यांची तात्काळ निवड करण्यात आली, तर 1,534 उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले.
या दोन दिवसीय मेळाव्यात एकूण 104 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तंत्रज्ञान, वित्त, विमा, रिटेल, ऑटोमोबाईल आणि ई-कॉमर्स या क्षेत्रांतील कंपन्यांनी विविध पदांसाठी भरती केली. अॅक्सेन्चर, विप्रो, फ्लिपकार्ट, टेक महिंद्रा, कॅनरा बँक, श्रीराम लाइफ इन्शुरन्स, लेंसकार्ट, मारुती सुझुकी व रेवा टेक्नॉलॉजीज या प्रमुख कंपन्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
पिल्लई महाविद्यालय (रसायनी), बिर्ला कॉलेज (कल्याण), एमजीएम कॉलेज (पनवेल), एसआयईएस कॉलेज (नेरूळ), परुल युनिव्हर्सिटी, सीकेटी कॉलेज (पनवेल) यासह राज्यातील आणि राज्याबाहेरील विविध नामांकित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या महा जॉबफेअरमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर उपयोग करून थेट कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि आपल्या कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण करत विविध पदांसाठी संधी प्राप्त केली. केवळ भरती प्रक्रियाच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यावसायिक विकासासाठी इंटर्नशिप्स, करिअर मार्गदर्शन सत्रे, सॉफ्ट स्किल्स आणि मुलाखत तंत्र यासंदर्भातील चर्चासत्रांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
यामुळे विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच्या संधी मिळवण्यापुरते मर्यादित न ठेवता उद्योगविश्वाचे प्रत्यक्ष अनुभव व व्यवसायिक दृष्टिकोन यांची समज मिळवण्याची संधी मिळाली. हा संपूर्ण उपक्रम कुलगुरू प्रा. (डॉ.) केशरीलाल वर्मा, अध्यक्ष प्रा. (डॉ.) प्रवीण गुप्ता, टीपीओ नारायण खर्जे, डॉ. कल्पना डभाडे, डॉ. विकास कुमार, डॉ. अल्का पांडे आणि डॉ. महेंद्र इंगोळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रातला मजबूत सेतू उभारण्याचे कार्य सुरू ठेवले असून, भविष्यात अशा प्रकारचे अधिक मेळावे आयोजित करून विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यास सज्ज करण्याचा निर्धार विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.