फोटो सौजन्य- नवराष्ट्र टीम
NCERT Class 9 Book Social Science Syllabus Update 2026: एनसीईआरटीचे (NCERT) इयत्ता ९ वीचे सामाजिक शास्त्राचे पाठ्यपुस्तक सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या पुस्तकात प्राचीन भारतातील समाजात महिलांची भूमिका आणि सामाजिक व्यवस्था याबद्दल माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये ‘मनुस्मृती’चा एक संदर्भ जोडण्यात आला आहे. तसेच, काळाच्या ओघात महिलांची स्थिती आणि समाज या दोन्हीमध्ये काय काय बदल झाले, यावरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.
या पुस्तकात मनूस्मृतीमधील एक प्रसिद्ध ओळ ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ ही ओळ समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणजेच ‘जिथे महिलांचा आदर-सन्मान केला जातो, तिथे देवतांचा वास असतो.’ या श्लोकाच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाची बाजू मांडण्यात आली आहे. मात्र, सर्वच काळात महिलांची स्थिती एकसारखी राहिली नाही, हेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. काळ बदलल्याने महिलांच्या भूमिकेत झालेल्या बदलांवर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. समाज आणि राजकारणात जसे बदलत गेले, तशी महिलांची स्थितीही बदलली, असे यात म्हटले आहे.
इयत्ता ९ वीच्या या पुस्तकात ‘भारत आणि जग’ (India and the World) नावाचा एक अध्याय समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये वैदिक काळाविषयी माहिती दिली आहे. या पाठात त्या काळातील महिलांच्या मजबूत स्थितीचे वर्णन करताना सांगितले आहे की, त्या काळात महिलांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार होता. समाजातील प्रत्येक महत्त्वाच्या कामात महिला भागीदार असायची आणि त्यांना स्वतःचा पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. तसेच समाजात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देण्यात आले होते.
हा नवा धडा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा नुकताच दिल्ली विद्यापीठाच्या (DU) लॉ फॅकल्टीमध्ये (विधी शाखा) मनुस्मृती शिकवण्याच्या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर डीयूच्या कुलगुरूंनी (Vice Chancellor) तो प्रस्ताव फेटाळून लावला होता. अखेर मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला नाही. मात्र, आता शालेय पातळीवर एनसीईआरटीच्या पुस्तकात याचा संदर्भ आल्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






