फोटो सौजन्य - Social Media
UPSC म्हणजे देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक. दरवर्षी हजारो विद्यार्थी सिव्हिल सेवा परीक्षेसाठी तयारी करतात, मात्र काहीच निवडक उमेदवार अंतिम यश मिळवतात. काहीजण पहिल्याच प्रयत्नात यश मिळवतात, तर काहीजण अपयशातून शिकत पुढे जातात. परी बिश्नोई ही अशाच एका जिद्दी आणि मेहनती विद्यार्थिनीची कहाणी आहे, जिने दोनदा अपयश आलं तरी हार न मानता तिसऱ्या प्रयत्नात UPSC CSE 2019 मध्ये ऑल इंडिया 30 वी रँक मिळवत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं.
राजस्थानमधील अजमेर येथे जन्मलेली परी बिश्नोई ही बिश्नोई समाजातील पहिली महिला IAS अधिकारी आहे. तिचे वडील मनीराम बिश्नोई हे वकील असून आई सुशीला बिश्नोई या अजमेरमध्ये जीआरपी पोलीस ठाण्यात ठाणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. परीचे बालपण शिक्षणाच्या महत्त्वाने भरलेलं होतं. तिच्या आई-वडिलांनी तिला लहानपणापासूनच शिकण्यास आणि मोठं होण्यासाठी प्रेरित केलं.
परीने राजस्थानमध्येच आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेली. दिल्ली विद्यापीठातून (DU) तिने पदवी घेतली, त्यानंतर अजमेरच्या MDS विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पदवी घेतल्यानंतरच परीने UPSC ची तयारी सुरू केली. तिचा अभ्यास अतिशय शिस्तबद्ध होता. दिवस-रात्र अभ्यास करत तिने सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहायचा निर्णय घेतला. तयारीच्या काळात ती मोबाईल फोनदेखील वापरत नसे. परीने UPSC ची परीक्षा एकूण तीन वेळा दिली. पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरले, मात्र तिने खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात जबरदस्त यश मिळवलं. 2019 साली तिने UPSC सिव्हिल सेवा परीक्षेत ऑल इंडिया 30 वी रँक मिळवत IAS अधिकारी म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे तेव्हा तिचं वय फक्त 23 वर्ष होतं.
परी बिश्नोई आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तिची मेहनत, सातत्य, आणि अपयशानंतरही न सोडलेली जिद्द हे तिच्या यशाचं खरे कारण ठरलं. ती सांगते की, “स्वप्न मोठं असलं पाहिजे, पण त्यासाठीची तयारी आणि समर्पण त्याहून मोठं असलं पाहिजे.”