Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मयदिपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नुकसानीची यादी प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्याने आपले नाव शोधण्यासाठी आणि तातडीने ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील ऑनलाइन सेवा वारंवार एका विस्कळीत होत असल्याने शेतकऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागत आहे, ज्यामुळे रांगा अधिकच वाढत आहेत. शेतकऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी असंख्य तास लागल्याने रांगा अधिकच लांबल्या आहेत. या समस्येमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण आहे. प्रशासनाने या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच यासंदर्भात अनेकवेळा तक्रार केल्यानंतरही अद्यापही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रशासनाने पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती संकलित केली होती. मात्र, आता समोर आलेल्या यादीमध्ये काही शेतकऱ्यांचे खाते क्रमांक चुकीचे नोंदवले गेल्याचे उघड होत आहे. तांत्रिक चुकांमुळे हक्काची मदत अडकण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. अशा त्रुटींमुळे शेतकऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवरच शिबिरे घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
एकाच वेळी शेकडो शेतकरी केंद्रांवर पोहोचत असल्याने सर्व्हरवर ताण येत आहे. ईकेवायसी करण्यासाठी आजचीच मुदत अनिवार्य नसल्याने शेतकऱ्यांनी संयम ठेवावा आणि सीएससी केंद्रांना सहकार्य करावे, असे खराशी येथील सीएससी केंद्रधारक कार्तिक झलके यांनी सांगितले.






