फोटो सौजन्य - Social Media
शहापूर तालुक्यातील वाशाळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. २१ जून २०२५ रोजी ‘पाऊलवाट फाउंडेशन, वसई’तर्फे गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी याच संस्थेने या भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला होता, आणि यंदाही त्या उपक्रमाची पुनरावृत्ती करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाची भर घातली.
या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर जाऊ नये, यासाठी पाऊलवाट फाउंडेशनने वह्या, पेन, दप्तर, छत्री यांसह विविध शालेय साहित्याचे वाटप केले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमात मुलांना गोड खाऊही वाटण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. कृपाल शिंदे यांनी पालकांना आवाहन करत सांगितले की, “काहीही झाले तरी आपल्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवू नका. शिक्षणच त्यांच्या भविष्यासाठी खरी गुरुकिल्ली आहे.”
कार्यक्रमाला पाऊलवाट फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश मोरे, सचिव डॉ. कृपाल शिंदे, खजिनदार श्रुतिका शिंदे, रेणुका मोरे, चिंतामणी बिल्डर्सचे सुरेश चिंतम, गावचे पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड तसेच ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक विष्णू चोथवे यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले. या वर्षी पाऊलवाट फाउंडेशनने एकूण ३२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले असून, संस्थेच्या या कार्याबद्दल उपस्थितांनी प्रशंसा व्यक्त केली. यावेळी डॉ. कृपाल शिंदे यांनी फाउंडेशनच्या कार्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व देणगीदारांचे आणि सहकार्य करणाऱ्या हितचिंतकांचे मन:पूर्वक आभार मानले.
पाऊलवाट फाउंडेशनचे हे कार्य समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी शिक्षणाचा उजेड घेऊन येणारे ठरत आहे. अशा उपक्रमांतून सामाजिक भान जोपासले जाते आणि शिक्षणाला प्रेरणा मिळते, हीच खरी या उपक्रमाची यशोगाथा म्हणावी लागेल.